मुंबई: मुंबई महापालिकेतल्या युतीसाठी शिवसेना-भाजपची आज चर्चा होणार आहे. मात्र त्याआधीच एका वॉर्डावरुन संभाव्य युतीत मोठा राडा होण्याची शक्यता आहे.


शिवाजी पार्कमधील वॉर्ड क्रमांक 191 सर्वांसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. कारण, मनसे आणि शिवसेनेपाठोपाठ आता भाजपदेखील या वॉर्डासाठी आग्रही आहे.

भाजपकडून वॉर्ड 191 साठी पोद्दार कॉलेजच्या प्राध्यापिका आणि खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा ओक सोमय्या यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे.

त्यामुळे या वॉर्डसाठी मनसेकडून गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा आहे. त्याला आव्हान देण्यासाठी शिवसेनेने माजी आमदार आणि माजी महापौर विशाखा राऊत यांना मैदानात उतरवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी एकमुखाने विशाखा राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

असं असताना आता भाजपनेही याच वॉर्डसाठी खासदार सोमय्या यांच्या पत्नीचे नाव पुढे केल्याने, शिवसेना-भाजप युतीबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे.

किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच भाजपच्या 50 टक्क्याहून अधिक वॉर्डमधील जागा वाढल्याचं शिवसेनेला ठणकावून सांगितलं आहे. तसंच सोमय्यांनी वेळोवेळी शिवसेनेच्या कथित भ्रष्टाचारावर बोट ठेवलं आहे.

त्यामुळे भ्रष्टाचारविरोधातील हंडी शिवाजी पार्कमधूनच फोडण्याचा निर्धार सोमय्यांनी केल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या
महापालिकेच्या युतीसाठी शिवसेना-भाजपमध्ये आज पहिली बैठक

दादरमध्ये शिवसेना मनसेचं आव्हान स्वीकारण्याच्या तयारीत