वाडा-भिवंडी रोडवर खड्ड्यामुळे दोघांचा मृत्यू, एक जखमी
एबीपी माझा वेब टीम | 21 Aug 2016 04:53 AM (IST)
पालघर : खराब रस्त्यांमुळे वाडा-भिवंडी रस्त्यावर आठवडाभरात तीन जणांचे बळी गेले आहेत. शनिवारी रात्री वाडा-भिवंडी रोडवर खड्ड्यांमुळे दोघा तरुणांना जीव गमवावा लागला आहे, तर एक जण जखमी आहे. शनिवारी रात्री आंभईजवळ खड्डयात अडकलेली बाईक काढण्यासाठी गेलेल्या तरुणांना मागून येणाऱ्या टेम्पोनं धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. मृतांच्या नातेवाईकांनी वाडा-मनोर रस्त्यावर रास्तारोको केला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. हा रस्ता बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर सुप्रीम कंपनीला बांधण्यासाठी दिला. या रस्त्यावर सुप्रीम कंपनी टोलवसुली करते, मात्र निकृष्ट दर्जा आणि अपूर्ण कामामुळे तीन वर्षात 138 जणांचे बळी गेले आहेत, तर दीड हजाराहून अधिक वाहनस्वार जखमी झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.