मुंबई : मुंबईकरांना पाण्याचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मुंबईत आजपासून (15 नोव्हेंबर) 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतही 15% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईला 24 तास पाणी देण्याचं शिवसेनेचं स्वप्न यंदा भंगलं.
पाणीकपातीच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी हिरवा झेंडा दाखवला. विशेष म्हणजे स्थायी समितीला डावलून महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला.
पाणीकपातीसंदर्भातला प्रस्ताव काल स्थायी समितीत आणण्यात आला होता. मात्र केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या शोकप्रस्तावानंतर कोणताच निर्णय न होता स्थायी समिती सभा तहकूब झाली. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय पुढच्या आठवड्यात घेतला जाणार होता. मात्र मनपा प्रशासनाकडून संध्याकाळी अचानक पाणीकपात लागू करण्यात आली.
मुंबईला सात प्रकल्पांमधून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 92 टक्के पाणीसाठा होता आणि यंदा या प्रकल्पांमध्ये त्याच दिवशी फक्त 76 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र सध्या 11 लाख दशलक्ष लीटर एवढंच पाणी मुंबईकडे आहे.
मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात तलावांमधून मुंबईला दररोज 3800 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या महिन्यातही जक्षिण मुंबईत मोठीच पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी मात्र तांत्रिक बिघाडाचे कारण देण्यात आले होते.
मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2018 12:10 AM (IST)
पाणीकपातीच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी हिरवा झेंडा दाखवला. विशेष म्हणजे स्थायी समितीला डावलून महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -