विरार : विरारच्या गोपचर पाडामध्ये राहणाऱ्या 52 वर्षीय अन्नपूर्णा पांड्याला पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलीय. तब्बल 15 महिन्यांच्या तपासानंतर विरार पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा छडा लावलाय.
14 फेब्रुवारी 2015 चा दिवस.. एकीकडे संपूर्ण जग आपल्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात मग्न होतं. तर अन्नपूर्णा, तिचा पती रजनीकांत पांड्याच्या हत्येचा कट तडीस नेण्याच्या प्रयत्नात होती.
आपल्या तीन साथीदारांच्या मदतीनं अन्नपूर्णानं रजनीकांतची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर अन्नपूर्णानं रजनीकांतचा मृतदेह परिसरातल्या नाल्यात फेकून दिला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून तिनं एक डाव आखला.
हत्येच्या दोन दिवसांनंतर पोलिसांना रजनीकांतचा मृतदेह सापडला. यावेळीही अन्नपूर्णानं मोठ्या चलाखीनं पोलिसांना दूर ठेवलं. रजनीकांतची हत्या अन्नपूर्णानंच केल्याचं समजल्यानंतर विरार पोलिसांनी तिचा पाठलाग सुरु केला होता. अन्नपूर्णा एका रिक्षाचालकासोबत गुजरातला पळून गेली होती.
मात्र ती पोलिसांना जास्त वेळ चकवा देऊ शकली नाही. पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अन्नपूर्णानं पती रजनीकांतची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान रजनीकांतच्या हत्येसाठी अन्नपूर्णाला मदत करणाऱ्यांचा विरार पोलिसांनी शोध सुरु केलाय.