झा भावंडांच्या आत्महत्येप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 06 Mar 2018 03:21 PM (IST)
पोलिस आणि पुढाऱ्याच्या त्रासाला कंटाळून विकास झा याने 9 नोव्हेंबर 2017 रोजी वसई डीवायएसपी कार्यालयासमोर आत्महत्या केली होती.
विरार : अमित झा आत्महत्येप्रकरणी विरारचे तत्कालीन पोलिस निरीक्षक युनूस शेख यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शेख यांना मुंबईतून अटक करण्यात आली. पोलिस आणि पुढाऱ्याच्या त्रासाला कंटाळून विकास झा याने 9 नोव्हेंबर 2017 रोजी वसई डीवायएसपी कार्यालयासमोर आत्महत्या केली होती. त्यानंतर भावाला न्याय मिळत नसल्यामुळे विकासच्या भावानेही दिनांक 20 जानेवारी 2018 रोजी विष पिऊन आयुष्य संपवलं. झा कुटुंबाच्या तक्रारीवरुन अमितच्या मृत्यूला कारणीभूत म्हणून पुढारी मुनाफ बलोच, मिथिलेश झा, अमर झा आणि पोलिस निरीक्षक युनूस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र युनुस शेख आणि मुनाफ बलोच पोलिसांच्या हाती लागले नव्हते. झा भावंडांच्या आत्महत्येनंतर झा कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्येची धमकी दिली होती. ज्या पोलिसांच्या जाचाला कंटाळून अमित आणि विकास झा यांनी आत्महत्या केली, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप झा कुटुंबियांनी केला होता. काय आहे प्रकरण? 10 नोव्हेंबर 2017 रोजी विकास झा या तरुणाने वसईच्या उपविभागीय कार्यालयात केरोसीन ओतून जाळून घेतलं होतं. पोलिसांच्या त्रासाला आणि सामाजिक कार्यकर्ते मुनाफ बलोच यांच्या मानसिक जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विकासच्या कुटुंबीयांनी केला होता. विकास झाच्या आत्महत्येला अडीच महिन्याचा कालावधी उलटला असतानाच त्याचा धाकटा भाऊ अमित झाने विषप्राशन करुन आयुष्य संपवलं. आपल्या भावाला न्याय मिळावा म्हणून विकासचा धाकटा भाऊ अमित झा अडीच महिन्यांपासून पोलिसांकडे हेलपाटे घालत होता. पण पालघर पोलीस भावाला न्याय देत नसून उलट चौकशीच्या नावाखाली मानसिक त्रास देतात, असा आरोप करत अमित झा यानेही औषध प्राशन केलं होतं. अमित आणि विकासच्या मृत्यूला स्थानिक पुढारी मुनाफ बलोच, मिथीलेश झा, अमर झा आणि पोलिस निरिक्षक युनूस शेख हे कारणीभूत असल्याचं कुटुंबियांनी म्हटलं होतं. मात्र पोलिसच गुन्हेगार असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे आम्ही संपूर्ण कुटुंब आत्महत्या करु, अशी धमकी कुटुंबीयांनी दिली होती.