Virar Building Collapse : विरार पूर्वेतील विजय नगर परिसरात घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर 36 तासांनंतर आणखी दोन मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. एका महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत 26 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मंगळवारी रात्री विरार पूर्वेतील विजयनगर परिसरात असलेल्या रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत अनेक कुटुंबे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) आणि वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून मदत व बचावकार्य राबवले जात आहे. प्रारंभी, जेसीबीसारखी यंत्रे घटनास्थळी पोहोचू शकत नसल्याने ढिगारा हटवण्यात अडथळे निर्माण झाले. मात्र, दुपारनंतर इमारतीच्या शेजारील चाळी रिकाम्या करून काही भाग पाडण्यात आला आणि त्यामुळे बचावकार्यास वेग मिळाला.
17 जणांचा दुर्दैवी मृत्यू
एनडीआरएफचे रेस्क्यू ऑपरेशन दुसऱ्या दिवशीही सुरूच असून, आतापर्यंत 26 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 9 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत ओमकार जोईल हे व्यक्ती बेपत्ता होते. त्यांचा मृतदेहही सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जर अजूनही कुणाचे नातेवाईक किंवा ओळखीचे व्यक्ती बेपत्ता असतील, तर त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावी, असे आवाहन विरार पोलीस नागरिकांना करत आहेत.
बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून अटक
दरम्यान, या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर वसई विरार महापालिकेने विरार पोलीस ठाण्यात अखेर सदोष मनुष्यवधाचा आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. नितल गोपीनाथ साने या बांधकाम व्यवसायिकाला विरार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच जागेच्या मालिकावरही देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी सन 2008 ते 2009 मध्ये चार मजली अनधिकृत इमारत बांधली होती. या इमारतीमध्ये 54 फ्लॅट आणि चार गाळे होते. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम 52, 53 आणि 54 नुसार गुन्हा दाखल केला असून BNS कलम 105 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या