ठाणे : लोकलच्या दारात उभं राहून प्रवास करताना एक मुलगी तोल जाऊन पडत असताना तिला अन्य प्रवाशांनी वाचवल्याचा व्हिडीओ काल व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दिसणाऱ्या मुलीचा अखेर शोध लागला आहे. मात्र आपल्या कृत्याचा पश्चात्ताप करण्याऐवजी मुलीची मुजोरी समोर आली आहे.
ही मुलगी मुळची भायखळा परिसरात राहणारी आहे. सोमवारी ती दिवा येथे राहणाऱ्या तिच्या मित्राला भेटण्यासाठी निघाली होती. यावेळी घाटकोपर-विक्रोळी रेल्वे स्थानकांदरम्यान दरवाजात उभी असताना तिचा हात सुटला आणि ती थेट खाली पडली. मात्र यावेळी तिच्या बाजूला उभ्या असलेल्या प्रवाशांनी तिला वाचवलं.
ही सगळी घटना एका प्रवाशाने मोबाईलमध्ये शूट केली होती आणि हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र या सगळ्यानंतर पश्चात्ताप करण्याऐवजी ती वेगळ्याच अविर्भावात माध्यमांसमोर आली. ज्याने वाचवलं तो देवमाणूस होता यात वाद नाही, पण ज्याने माझा व्हिडीओ काढून पसरवला, त्याचा पत्ता मला द्या, त्याला मी सोडणार नाही, असा पवित्रा तिने घेतला.
तसेच शूटिंग करण्याऐवजी तो मला वाचवू शकत नव्हता का? असाही प्रश्न तिने केला. दारात उभं राहणं ही तुझी चूक होती का? याबाबत विचारलं असता, मी केवळ हात झटकण्याचा प्रयत्न केला आणि पडले, यात काय चूक आहे? असा प्रतिप्रश्न तिने केला. या सगळ्यात या मुलीच्या हाताला दुखापत झाली असून तरीही तिची मुजोरी काही कमी झालेली नाही.
पाहा व्हिडीओ