मुंबई: शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला, या आशयाचे चित्र चौथीच्या इंग्रजी माध्यमाच्या इतिहासाच्या कोणत्याही आवृत्तीमध्ये प्रकाशित करण्यात आलेले नाही. पाठयपुस्तक मंडळाने सन 1970 पासून आतापर्यंत प्रकाशित केलेल्या चौथीच्या पाठयपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज व अफझल खान यांच्या भेटीचे चित्र दाखविण्यात आले ओह. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमावर विश्वास ठेवून व खरा इतिहास न वाचता अशा पध्दतीचा चुकीचा प्रचार करण्यात येत आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केले.


 

सन 2014 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या चौथीच्या पुस्तकात शिवछत्रपती या पाठयपुस्तकातील धडा क्र.16 राज्य कारभाराचे घडी बसवली, धडा क्र.18 शिवरायांची युध्दनिती, धडा क्र.19 रयतेचा राजा व धडा क्र.20 स्फुर्तीचा जीवंत झरा हे चार धडे पुनर्विलोकन करून या धडयांमध्ये पूर्वी असलेल्याच आशयाचेच कृतीयुक्त अध्ययनाद्वारे नव्याने मांडणी करण्यात आली आहे. तसेच, शिवाजी महाराजांच्या कुशल व्यवस्थानाबाबतची सखोल माहिती समाविष्ट करण्यात आले. आणि हे सन 2016 मध्ये प्रकाशित केलेल्या सुधारित आवृत्तीमध्ये धडा क्र.17-गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन आणि धडा क्र.18 मध्ये लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन हे दोन अधिक धडे समाविष्ट केलेले असेही तावडे यांनी सांगितले.

 

नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या दोन धड्यांमध्ये पूर्वीच्या पाठांमधून आवश्यक तो मजकूर व अधिकचा तपशिलवार मजकूर विद्यार्थ्यांना समजेल, अशा सोप्या पध्दतीने व आकर्षक मांडणी करून देण्यात आलेला आहे. उदा. नवीन पाठांमध्ये शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ, आरमार, किल्ले, हेर खाते, गनिमीकावा, किल्ल्यांचे रक्षण, शिवरायांची कडक शिस्त, उदार धार्मिक धोरण, साधु-संतांचा आदर, हिंदवी स्वराज्य, पर्यावरणाचे संरक्षण इ. बाबी समाविष्ट केलेल्या आहेत. असे स्पष्ट करताना तावडे म्हणाले की, ''पाठयपुस्तक मंडळामार्फत एकूण 8 भाषांमध्ये पाठपुस्तकाची निर्मिती केली जाते.  त्यानुसार मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, गुजराती, सिंधी व तेलगू या सर्व भाषांच्या सुधारित आवृत्त्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत.''

 

पाठयपुस्तक मंडळाने सन 1966, सन 1988,  सन 2004 व सन 2012 या अभ्यासक्रमावर आधारित अनुक्रमे सन 1970, सन 1992, सन 2009 व सन 2014 या वर्षी शिवछत्रपती इयत्ता चौथीच्या या पाठयपुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित केली.   प्रत्येक वेळी प्रकाशित केलेल्या पाठयपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज व अफझल खान यांच्या भेटीचेच चित्र प्रतापगडावरील पराक्रम या पाठामध्ये दाखविण्यात आले होते. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला, या आशयाचे चित्र वरील पैकी कोणत्याही आवृत्तीमध्ये प्रकाशित करण्यात आलेले नव्हते. सन 2016 मध्ये ज्यावेळी या पुस्तकाची सुधारित आवृत्ती (परिसर अभ्यास – 2) या नावाने प्रकाशित करण्यात आली. त्यावेळीही पूर्वीच्या आवृत्यांमधील चित्र वापरण्यात आलेले आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढल्याचे चित्र पाठपुस्तकातून वगळयात आले, अशा आशयाचा सोशल मीडियावर होणारा अपप्रचार चुकीचा आहे. असेही तावडे यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात स्पष्ट केलेले आहे.