मुंबई : माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या ठाकरेंची सेना सोडण्याची चर्चा सुरु असताना विनोद घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आपण आणि आपल्या सून उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी खासदार संजय राऊतांनी अभिषेक घोसाळकरांचं नाव घेताच विनोद घोसाळकर भावुक झाल्याचं दिसून आलं. काही दिवसांपूर्वी घोसाळकर यांच्या स्नुषा तेजस्वी घोसाळकर या नाराज असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर घोसाळकरांनी मातोश्रीवर जाणं महत्त्वाचं मानलं जातं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरेंची भेट घेताना भावुक झाले. काही दिवसांपूर्वी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करत विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाचा राजीनामा दिला होता.
Vinod Ghosalkar Meet Uddhav Thackeray : अभिषेकचं नाव काढताच घोसाळकर भावुक
आपल्या सुनेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून पक्ष प्रवेश करण्यासंदर्भात दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप विनोद घोसाळकर यांनी केला होता. त्यामुळे विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र सकाळी संजय राऊत यांच्या भेटीदरम्यान घोसाळकर हे त्यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर यांचे नाव काढता भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.
विनोद घोसाळकर हे शिवसेनेच्या जुन्या नेत्यांपैकी एक आहेत. सध्या उपनेते म्हणून ते पक्षात कार्यरत आहेत. मागील वर्षी विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर याची हत्या करण्यात आली. त्यानंतर विनोद घोसाळकर विधानसभा निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिकीट घेऊन स्वतः मैदानात उतरले. मात्र त्यांचा त्यात पराभव झाला.
Tejasvee Ghosalkar Resignation : तेजस्वी घोसाळकरांचा राजीनामा
घोसाळकर यांच्या सून तेजस्वी घोसाळकर या सुद्धा माजी नगरसेविका म्हणून पक्षात काम करत आहेत. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांनी शिवसेना पक्षातील पदांचा राजीनामा दिला. त्यांनी त्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट सुद्धा घेतली होती. यामध्ये तेजस्वी घोसाळकर शिवसेना पक्ष सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या.
Abhishek Ghosalkar Murder : तेजस्वी घोसाळकरांवर शिंदेंचा आणि भाजपचा दबाव
तेजस्वी घोसाळकर यांच्यावर शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून दबाव पक्षप्रवेशनासाठी टाकला जात असल्याचं घोसाळकर यांनी आज माध्यमांसमोर सांगितलं. शिवाय आपण कुठेही जाणार नसून शिवसेनेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
त्या आधी संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अभिषेक घोसाळकर यांची मागील वर्षीच हत्या झाली तरी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षप्रवेशासाठी त्यांच्या सुनेवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला. अभिषेक घोसाळकर यांचं नाव काढताच विनोद घोसाळकर भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.
तेजस्वी घोसाळकर यांच्या राजीनाम्यानंतर विनोद घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर यांना पक्षातून डावलले जात असल्याच्या मध्यंतरी चर्चा होत्या. कारण घोसाळकर हे ठाकरेंच्या शिवसेनेला सोडतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र आपल्याबद्दल चुकीच्या चर्चा आणि माहिती पसरली जात असल्याचे घोसाळकरांनी स्पष्ट केलं. पक्षप्रवेशासाठी दबाव टाकला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
घोसाळकर सून आणि सासरे नेमकी काय भूमिका घेत आहेत? घोसाळकर म्हणत असलेला दबाव हा खरच पक्षप्रवेशासाठी आहे का? हे प्रश्न मागील काही दिवसांपासून चर्चिले जात आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरेंसोबत राहणार हे त्यांनी स्पष्ट केलं. तर मग तेजस्वी घोसाळकर नेमका काय निर्णय घेणार? हे सुद्धा पहावं लागेल.