मुंबई : ओबीसी असल्यामुळे राज्याचं महसूल मंत्रिपद मिळालं नाही अशी खदखद व्यक्त करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. "वडेट्टीवार यांना पुढील काळात मोठी संधी मिळेल, त्यांनी थोडी वाट पाहावी," असा सल्ला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. "काँग्रेसने वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री बनवलं. बॅरिस्टर अंतुले यांना काँग्रेसने संधी दिली. वडेट्टीवार यांचं वय पाहिलं तर मोठी संधी पुढच्या काळात मिळेल, त्यांना थोडी वाट पाहावी लागेल," असं थोरात मुंबईत म्हणाले.


"काँग्रेस बिलकुल जातीयवादी किंवा धर्मवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. वडेट्टीवार यांना वेगळं काहीतरी म्हणायचं असेल, आपल्या सगळ्यांचा गैरसमज झाला असेल. वडेट्टीवारांचं वय पाहिलं तर खूप मोठी संधी पुढच्या काळात मिळणार आहे. त्याकरता त्यांना थोडीशी वाट पाहावी लागेल," असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.


विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?
दरम्यान लोणावळ्यात आयोजित ओबीसी शिबीरात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ओबीसी असल्यामुळे महसूल खात्यापासून वंचित राहिलो, असं ते म्हणाले होते. "महाराष्ट्रात 3 दिवस फिरलो, तरी 25 लाखांची सभा होईल. झुकती है दुनिया झुकाने वाले चाहिये. मला ओबीसीचं खातं भेटलं तेव्हा चपरासी देखील नव्हता. मी उधारीवर हे खातं चालवतो. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय. ओबीसी खात्यात जागा भरण्यासाठी पैसे नाही म्हणतात. कार्यालयालाही जागा नाही. काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं चुकी झाली. विरोधी पक्ष नेता होतो. ओबीसीचं नेतृत्व करतो. मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटले. कारण मी ओबीसी आहे ना."


देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात आरक्षण देतो नाहीतर राजकीय संन्यास घेतो, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात राज्यभरात शनिवारी केलेल्या आंदोलनात केलं होतं. त्यावरही बाळासाहेब थोरात यांनी निशाणा साधला आहे. "देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फारच गांभीर्याने घेतलं. स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असंही ते म्हणाले होते. धनगर आरक्षणाचाही शब्द दिला होता. पण त्यांनी 
दिशाभूल केली. सत्तेसाठी बोलायचं, वारेमाप आश्वासनं द्यायची हा भाजपचा अनुभव आहे.
मोदीजी केंद्रात आणि राज्यात समाजाला फसवून हा उद्देश ठेवून ते बोलतात."