मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी 7 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. त्यात नारायण राणेंच्या उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. मात्र आता भाजपने आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरु केली आहे.
यामध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, शायना एनसी आणि प्रसाद लाड यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपचा उमेदवार निवडून येणं कठीण आहे आणि राणेंना शिवसेनेचा विरोध आहे.
शिवसेनेच्या सहमितीनेच भाजप उमेदवार ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नारायण राणेंऐवजी इतरांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुढच्या काळातील पोटनिवडणुकीत नारायण राणेंना विधानपरिषदेत पाठवलं जाऊ शकतं. पण त्यामुळे राणेंचा मंत्रिमंडळातील प्रवेशही लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.