VIDEO : मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मुंबईत वृद्धेला जीवदान
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 02 Feb 2017 11:44 PM (IST)
मुंबई : 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा प्रत्यय मुंबईतल्या चर्नीरोड रेल्वे स्टेशनवर आला. मोटरमनने प्रसंगावधान राखून वेळीच ट्रेन रोखल्याने ट्रॅकवरील वृद्धा थोडक्यात बचावली आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वे स्थानकावर सुदैवाने हा अपघात टळला. एक वृद्ध महिला रेल्वे ट्रॅकवर चालत होती. त्याचवेळी चर्चगेटवरुन अंधेरीच्या दिशेने जाणारी लोकल स्टेशनवर आली. ट्रेन आल्याचे पाहून महिलेने फलाटावर चढण्याचा प्रयत्न केला, मात्र वर चढण्यात तिला अडचणी येत होत्या. लोकल महिलेच्या अगदीच जवळ आली होती, मात्र मोटरमन संतोष कुमार गौतम यांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच ब्रेक दाबला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि वृद्धेचे प्राण बचावले. महिला ट्रॅकवर का आली, हे मात्र समजू शकलेलं नाही. 6 डिसेंबरची ही घटना असून तिचं मोबाईलवर शूटिंग करण्यात आलं होतं.