मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचे आज पहाटे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. रायकर हे तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि कोरोना झाला होता. डेंग्यू बरा झाला मात्र लंग्ज इन्फेक्शन 80 टक्के होते. नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
दिनकर रायकर हे लोकमत वृत्तपत्राचे समन्वयक संपादक होते. सक्रिय मराठी पत्रकारितेत त्यांचं दीर्घकाळ योगदान राहिलं. गेली काही वर्षे त्यांनी दैनिक लोकमतमध्ये समूह संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली.
रायकर यांची गुरुवारी रात्री आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र पहाटे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. पहाटे तीन वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रायकर यांनी इंडियन एक्स्प्रेसमधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. दैनिक लोकसत्तामधून निवृत्त झाल्यावर त्यांनी लोकमत समूहामध्ये संपादकपदाची जबाबदारी सांभाळली.
रायकर हे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ तसेच मुंबई प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष देखील होते. त्यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्काराने रायकर यांना सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रायकर यांना श्रद्धांजली
पत्रकारितेच्या क्षेत्रात मुल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दिवंगत रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढ्यांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरीत्या बजावली. त्यामुळे मराठी पत्रकारितेच्या मुल्यांचे जतन आणि जगभरातील आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. नवनवीन आशय संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी उभी राहिली, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक हरपला- उपमुख्यमंत्री अजित पवार
"ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. दिनकर रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. राज्याच्या विकासप्रक्रियेत महत्वाचं योगदान दिलं. युवा पत्रकारांना मार्गदर्शन केलं. प्रोत्साहन दिलं. पत्रकारितेत तरुणांच्या पिढ्या घडवल्या. त्यांचं निधन ही राज्याच्या पत्रकारिता, साहित्य क्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मंत्र्यांसह नेतेमंडळींकडून रायकर यांना श्रद्धांजली