नवी मुंबई : नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि देशभरातून येणारा भाजीपाला मुंबई आणि संपूर्ण उपनगरांना पुरवला जातो. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात भाजीपाला आवक होत असल्याने दरात घसरण झाली आहे. महाराष्ट्र बरोबर परराज्यातून एपीएमसी दिवसाला 650 ते 700 गाड्यांची आवक होवू लागली आहे. नाशिक , नगर, सांगली , पुणे  त्याचबरोबर कर्नाटक , आंध्रप्रदेश, गुजरात , मध्य प्रदेश मधूनही भाजीपाला येवू लागला आहे. थंडीचा मोसम असल्याने याचा सकारात्मक परिणाम भाजीपाला उत्पादनावर झालाय. त्यामुळे आवक वाढल्याने दर आता 30 ते 40 टक्के खाली आले आहेत.

एपीएमसी मार्केट होलसेल दर - प्रति किलो

वांगी - 8-10 रूपये किलो
कार्ली - 12-13
भेंडी - 12-14
टोमॅटो - 11-13
दोडका - 10-13
गवार - 24-25
वटाणा - 18-20
फ्लावर - 8-10
कोबी - 5-7
ढोबळी मिरची - 10-12
गाजर - 15-16
मिर्ची - 11-14

प्रति जुडी किंमत -

कोथिंबीर - 8-10
पालक - 5-6
मेथी - 6-8

एपीएमसीमधून दिवसाला 2 हजार गाड्या मुंबई, उपनगर, वसई-विरार, कल्याण डोंबिवली, पनवेल भागात पुरवला जातो. मात्र आता या मालवाहतूक दारांनी दरवाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या डिझेल 87 रूपयांवर पोहोचल्याने दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्टीकरण मालवाहतूक दार संघटनेने दिले आहेत. डिझेल 61 रूपये होते तेव्हा ठरवण्यात आलेले टेम्पोभाडे आजही आहे तेच आहे. मुंबई मालवाहतूक टेम्पो महासंघाने येत्या 1 मार्चपासून मालवाहतूक भांड्यात 15 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. डिझेल बरोबर टायर, टोल, इन्शुरन्स, स्पेअरपार्ट, पार्किंग इत्यादी गोष्टीतही गेल्या काही वर्षांत वाढ झाल्याने ड्रायव्हर लोकांचा पगार देणे आणि गाड्यांचे बॅंक हप्ते भरणे मुश्किल झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव भाडेवाढ करावी लागत असल्याने येत्या गुरूवारी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.  भाडेवाढ झाल्यास साहजिकच त्याचा भुर्दंड ग्राहकांवर बसणार आहे. किरकोळ व्यापाऱ्यांकडून चढ्या दरात भाजीपाला, कांदा बटाटा, फळे विकली जाणार असल्याने महागाई आपोआपच वाढणार आहे.

संबंधित बातम्या :

भाजीपाला, फळांचे दर कडाडणार! इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीवर 15 टक्के दरवाढ