वसई : मुंबईला लागून असलेल्या मिरा रोडमध्ये पैशाच्या हव्यासापोटी दोघा सख्ख्या बहिणींनी नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन तरुणींनी आपल्या 16 वर्षांच्या धाकट्या बहिणीच्या कौमार्याचा दीड लाखांना सौदा केल्याचं उघडकीस आलं आहे. मिरा रोडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेतर्फे पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे, तर दोन बहिणींसह दलालाला अटक केली आहे.
काही पैशांच्या लालसेपोटी मिरा रोडमध्ये राहणाऱ्या दोन तरुणी आपल्या सोळा वर्षांच्या अल्पवयीन बहिणीच्या कौमार्याचा सौदा करण्यासाठी निघाल्या होत्या. एका दलालाकडून चक्क दीड लाख रुपयांना त्या आपल्या सख्ख्या बहिणीला एका रात्रीसाठी विकायला निघाल्या.
मिरा रोडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाला एका अल्पवयीन मुलीच्या कौमार्याचा सौदा होत असल्याची कुणकुण लागली. पोलिसांनी आपल्या खोटा ग्राहक पाठवून, सत्यता पडताळून पाहिली. त्यावेळी दोन बहिणी एका दलालाकडून आपल्या अल्पवयीन बहिणीचा दीड लाखांना सौदा केला.
या दोघी बहिणी आणि दलालाला पैसे स्वीकारताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पुढाकाराने या मुलीची तसंच आणखी एका युवतीची या दलदलीत जाण्यापासून सुटका झाली.