मुंबई : भारताची लोकशाही जगात सर्वात श्रेष्ठ मानली जाते आणि लोकशाही प्रक्रियेत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आहे. निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. पण मागील काही वर्षांपासून देशात ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत ते पाहून जनतेचा निवडणूक आयोगावरचा विश्वास कमी होत चालला आहे. मतचोरी उघडपणे होत आहे, पण निवडणूक आयोग मात्र महाभारतातील धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे, अशी घणाघाती टीका मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
लोकसभेत मतचोरीवर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशात होत असलेला मतचोरीचा पुराव्यासह भांडाफोड केला. मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गडबड घोटाळे होत आहेत. महाराष्ट्रात 2019 ते 2024 या पाच वर्षात 39 लाख मतदार वाढले होते. पण 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या पाच महिन्याच्या काळात तब्बल 32 लाख मतदार वाढले हे संशयास्पद आहे.
भाजप सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा नारा देते. पण बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेऊ शकत नाही. या निवडणुका एकाचवेळी झाल्या असत्या तर निकाल काही वेगळे असले असते असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी SIR ची प्रक्रिया राबवण्यात आली, त्यानंतर 12 राज्यात ही प्रक्रिया राबवण्याची घोषणा केली. पण त्यातून महाराष्ट्राला मात्र वगळण्यात आले. निवडणूक प्रक्रिया हा थट्टेचा विषय बनला आहे अशी टीका त्यांनी केली.
खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोरोना, नोटबंदी, हवाई वाहतुक क्षेत्राबद्दल धोक्याचा इशारा दिला होता. पण सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागले. सरकार विरोधकांचे ऐकत नाही, पण राहुल गांधी यांनी जे सांगितले तसेच घडले आहे. आताही राहुल गांधी यांनी मतचोरीचे अनेक प्रकार उघड केले पण निवडणूक आयोग व सरकारही ते गांभिर्याने घेताना दिसत नाही. रुपया व निवडणूक आयोग यांच्यात अवमूल्यनाची स्पर्धा लागली आहे की काय, असे वाटते असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
ही बातमी वाचा: