मुंबई : मुंबईत स्वतःचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असतं. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मुंबईतल्या विविध भागांमध्ये भाड्याने राहणारे मुंबईकर घरांमध्ये सहा महिने अडकून पडले होते. या कालावधीत त्यांना स्वतःच्या घराचं महत्व कळलेलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मुंबईकरांनी मुंबईसह उपनगरांमध्ये सुरू असलेल्या अनेक गृह प्रकल्पांवर घर खरेदीसाठी विचारपूस सुरू केलेली आहे. मुंबईकरांना स्वतःचं घर त्यांच्या बजेटमध्ये उपलब्ध व्हावं यासाठी क्रेडाई संस्था त्यानं मदत करत आहे.


मुंबईची लोकसंख्या साधारण अडीच कोटीच्या घरात आहे. यामध्ये बहुतांश लोक वेगवेगळ्या राज्यातून स्थलांतरित होऊन अनेक वर्ष ते मुंबईत राहत आहेत. आणि ते आता मुंबईकरही झालेले आहेत. मुंबईत विविध भागांमध्ये झोपडपट्टी, मोठ्या चाळी तसेच काही छोट्या गृहप्रकल्पमधील छोट्या-छोट्या घरांमध्ये मुंबईकर दाटीवाटीने आपलं जीवन जगत आहेत. दोन वर्षापूर्वी झालेली नोटबंदी, त्यानंतर कोरोना संक्रमण यामुळे घर बांधणी प्रकल्प आणि मुंबईकरांचं बजेट हे कोलमडून पडलेलं होतं. मात्र गृहबांधणी प्रकल्पाला पुन्हा ऊर्जितावस्था देण्यासाठी तसेच नागरिकांना स्वतःचं हक्काचं घर त्यांच्या बजेटमध्ये मिळून मिळण्यासाठी राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटीमध्ये घट केलेली आहे. तर मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांनी तयार असलेली घरं मुंबईकरांना खरेदी करता यावीत यासाठी त्यांनी विविध ऑफर्सही दिलेल्या आहेत. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे मुंबईकरांच्यावतीने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली बदलापूर तसेच वसई, नालासोपारा, विरार या भागांमध्ये सुरू असलेल्या गृह प्रकल्पांमध्ये आपल्या बजेटमध्ये बसणारी घरं पाहण्यासाठी सुरुवात केलेली आहे.


आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. सणासुदीचं औचित्य साधून नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी येणार नवीन वर्ष या सर्व आनंदाच्या क्षणांमध्ये मुंबईकरांना स्वतःचे घर मिळावं यासाठी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांनी फेस्टिवल ऑफर सुरू केलेल्या आहेत. स्टॅम्प ड्युटीमध्ये शासनाने दिलेली सूट, विविध बांधकाम व्यवसायिकांनी दिलेल्या ऑफर्समुळे मुंबईकरांसाठी स्वतःचं हक्काचं घर घेण्यासाठी एक चांगली संधी निर्माण झालेली आहे. मुंबईमध्ये वर्षानुवर्ष बांधकाम व्यवसायात काम करणार्‍या बांधकाम मजुरांनी कोरोनामध्ये मुंबईतून काढता पाय घेतला होता. मात्र आता पाच महिन्यानंतर मोठ्या संख्येने हे मजूर पुन्हा मुंबईत परतल्यामुळे मुंबईसह उपनगरातील विविध गृह प्रकल्पांचं काम पुन्हा सुरू झालेलं आहे.


मुंबईकरांना आपल्या हक्काचं आणि आपल्या बजेटमधलं घर घेण्याची हीच संधी उपलब्ध झालेली आहे. या संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे. कारण राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटी चार टक्क्यांवर आणली असून अनेक बांधकाम व्यवसायिक वेगवेगळ्या ऑफर्स घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा मुंबईकर सध्या घेताना दिसत आहेत. मुंबईकरांनी ऑनलाईन पद्धतीने कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक गृह प्रकल्पांची माहिती घेतली आहे. आता परिस्थिती पूर्ववत होत असताना स्वतः मुंबईकर या गृह प्रकल्पांना भेटी देत आहेत. ग्राहकांना आलेल्या अनेक अडचणींना मार्ग दाखविण्यासाठी क्रेडाई संस्था नेहमीच तत्पर असते. आम्ही या संस्थेच्या माध्यमातून ग्राहक आणि बांधकाम व्यवसायिक यांच्या हितासाठी काम करीत आहोत, असं क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोराडिया यांनी सांगितलं.