मुंबई : दिवाळीच्या काळात जर लस घेण्यास बाहेर पडत असाल तर मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्यापासून म्हणजे गुरुवार दिनांक 4 नोव्हेंबर ते रविवार दिनांक 7 नोव्हेंबर 2021 असे चार दिवस मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर कोविड लसीकरण बंद राहणार आहे. त्यानंतर सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी लसीकरण पूर्ववत सुरु करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येतेय. 


मुंबई महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सोमवारपासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचं दिसून येत आहे. असं असलं तरी अद्याप सगळ्या मुंबईकरांचं लसीकरण झालेलं नाही. मुंबईकरांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या वतीनं मुंबईत 100 टक्के लसीकरण झालेल्या सोसायटी, इमारती आणि कार्यालयांवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' म्हणजे, पूर्णपणे कोरोनाची लस घेतलेली इमारत, असा फलक लावण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मुंबईतील 10 हजार सोसायट्या लसवंत (Fully Vaccinated) झाल्या असून 10 हजार इमारतीतील रहिवाशांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.


मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कोरोनाचा साप्ताहिक ग्रोथ रेट कमी होऊन ०.०4 टक्केंवर आला आहे. दोन महिन्यांपूर्वी मुंबईचा ग्रोथ रेट 0.06 टक्केंवर पोहचला होता. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही वाढला आहे. शहरात झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही. मुंबईतील ॲक्टिव्ह कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्याही चार हजारांपेक्षा कमी झाली आहे.


महत्वाच्या बातम्या :