मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या वतीने आज अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पालिकेच्या के पूर्व विभागातील विजयनगर सहनिवास सोसायटी येथे आज मुंबईतील अंथरुणाला खिळलेल्या पहिल्या रुग्णाला लस देण्यात आली. यानंतर पालिकेच्या डॉक्टरांची एक टीम रुग्णाला काही त्रास जाणवतो आहे का हे पाहण्यासाठी थांबली आणि अर्ध्या तासानंतर पुढील इतर 25 रुग्णांना लस देण्यासाठी निघून गेली.


दीर्घ आजारपणामुळे, शारीरिक अपंगत्वामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यास मुंबईत आज सुरुवात झाली आहे. आज अंधेरीतील के पूर्व विभागापुरतेच प्रायोगिक तत्त्वावर या लसीकरणाची सुरुवात झाली आहे. ज्या नागरिकांना जागेवरुन हलता येत नाही किंवा ते बरेच महिन्यांपासून अंथरुणाला खेळलेले आहेत अशा नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देता येईल का याबाबतची पूर्वतयारी मुंबई महापालिकेने सुरू केली होती. याकरिता अशा पद्धतीच्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचं काम ही सुरू करण्यात आलं होतं. त्यानुसार आज अंधेरी येथील विजय नगर सहनिवास सोसायटीमध्ये 79 वर्षाच्या महिलेला घरी जाऊन लस देऊन या मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे. 


अंथरुणाला खिळून व्यक्तींचं लसीकरण करायचं असल्यास अशी नोंदणी करा
याबाबत बोलताना महानगर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी उर्मिला पाटील म्हणाल्या की, आमच्याकडे आत्तापर्यंत 209 लोकांनी नोंदणी केली आहे. आज आम्ही पंचवीस रुग्णांना त्यांच्या घरी जाऊन लगेच लस देणार आहोत. यापुढे देखील अंथरुणाला खिळून असणाऱ्या व्यक्तींचं लसीकरण करायचं असल्यास त्यांची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणात खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvaccsbedridden@gmail.com या मेल आयडीवर पाठवायची आहे.  यासोबतच अशा व्यक्तींचं पुढील किमान सहा महिने अंथरुणात खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमती पत्र किंवा नातेवाईक यांचे संमतीपत्र प्रशासनाला सादर करणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना कोव्हँक्सिन लस देण्याचे आदेश तज्ञांच्या संमतीने दिले आहेत. आज तज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीत लसीकरण प्रक्रिया पार पडली आहे.


याबाबत बोलताना पालिकेचे अधिकारी प्रशांत सपकाळ म्हणाले की, सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार आज लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन त्यानंतरची डॉक्टरांची टीम घरी जाऊन अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना लस देत आहेत. मात्र, यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. यासाठी पालिकेच्या वतीने एक मेल आयडी देखील देण्यात आला आहे. यावर आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तत्काळ अशा रुग्णांना घरी जाऊन लस देण्यात येईल. यावेळी डॉक्टरांच्या टीम सोबत पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. के पूर्व परिसरात सुरू असणारं लसीकरण जरी प्रायोगिक तत्वावर असलं तरी लवकरच इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होईल.