Mumbai Manholes, Court : मुंबईतील मॅनहोल्सवरील संरक्षित जाळ्या अथवा त्यावरील झाकणं चोरीला जात असतील याची रितसर तक्रार का नोंदवत नाही?, असा सवाल उपस्थित करत हा फौजदारी गुन्हा असतानाही कोणीही याची आजवर तक्रार दाखल न केल्याबद्दल पालिका प्रशासन आणि कोर्टात आलेल्या याचिकाकर्त्यांसह राज्य सरकारच्या उदासीनतेवरही हायकोर्टानं खंत व्यक्त केली. तसेच आतापर्यंत मॅनहोलवरील झाकणं चोरीबाबत किती तक्रारी केल्या? त्यावर काय कारवाई केली?, याबाबत पालिकेला मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करून त्याबाबत सुरू केलेल्या कारवाईचे 24 जुलैच्या पुढील सुनावणीत तपशील सादर करण्याचे आदेश सोमवारी जारी केले आहेत.
राज्यासह मुंबईतील रस्त्यांची दुरावस्था आणि उघड्या मॅनहोल्ससंदर्भात वकील रुजू ठक्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. आपल्या अधिकारांबाबत प्रत्येक नागरिकाला जाणीव असणं गरजेचं आहे. त्यांना कुठेही उघडं आणि धोकादायक मॅनहोल दिसल्यास त्यांनी तातडीनं त्याची पालिकेकडे तक्रार करणं आवश्यक आहे. तसेच मॅनहोलवरील झाकण चोरीला गेल्यानंतर ते विकत घेणाराही तेवढाच कठोर शिक्षेला पात्र असून राज्य सरकारनं अशा भंगारवाल्यांवरही कठोर कारवाई करावी, अस मत प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं व्यक्त केली. याकामात वाहतूक पोलीसांचीही मदत होऊ शकेल, कारण हे रस्त्यावर नेहमीच गस्त घालत असल्याने त्यांना उघड्या मॅनहोलची माहिती असू शकते. त्यामुळे त्यांनीही एखादं उघड मॅनहोल आढळल्यास पालिकेला कळवावं आणि नागरिकांना तिथं जाण्यापासून रोखावं, अशी सुचनाही न्यायालयाने यावेळी केली.
पालिकेनं कोर्टात काय माहिती दिली ? -
शहरातील सर्व उघडी मॅनहोल्स आता झाकलेली आहेत तर उपनगरातील 60 तक्रारींचे निवारण करण्यात आलेलं आहे. उघड्या मॅनहोलवरील झाकणं चोरीला जाणं हीच खरी मुळ समस्या आहे. धोकादायक मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसविण्यासाठी ऑक्टोबर ते जून पर्यंतचा कालावधी लागू शकतो. कारण, सध्या पावसाळ्यात मॅनहोलवर काम करणं शक्य नाही, अशी माहिती पालिकेच्यावतीनं जेष्ठ वकील अनिल साखरे यांनी हायकोर्टाला दिली. पालिकेकडून सर्व वॉर्डमध्ये यासंदर्भात सध्या सर्वेक्षण सुरू आहे. कुठेही उघडी मॅनहोल दिसल्यास ताप्तुरत्या तत्त्वावर त्यावर बॅरीकेट्स लावली जातील. नवीन झाकण बसेपर्यंत तिथे कर्मचारी तैनात करण्यात येईल, अशी ग्वाही पालिकेच्यावतीनं हायकोर्टाला देण्यात आली.
इतर संबधित बातम्या :
Mumbai Rain News : मायानगरीत पावसाचा धुमाकूळ, तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू