मुंबई : पीटर मुखर्जींच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी सीबीआयने वेळ मागितल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 6 मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मंगळवारी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यापुढे या जामीन अर्जावर सुनावणी झाली.


शीना बोरा हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या पीटर मुखर्जीचा हा सहावा जामीन अर्ज आहे. विशेष सीबीआय कोर्टानं वैद्यकीय कारणांसाठी केलेला जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं पीटरने याच कारणासाठी आता हायकोर्टात अर्ज केला आहे. त्याचबरोबर तपासयंत्रणेकडे आपल्याविरोधात सहळ पुरावे नाहीत असा पीटरचा दावा अजूनही कायम आहे.

पीटर मुखर्जींना 16 मार्च 2019 ला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. कोर्टाच्या संमतीने त्यांना शस्त्रक्रियेसाठी जेजेच्या जेलवॉर्डमधून त्याच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान हाच मुद्दा पुढे करत पुन्हा एकदा पीटरच्या वकिलांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्जही विशेष सीबीआय कोर्टानं फेटाळून लावला आहे.

काय आहे प्रकरण?

शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मागील महिन्यात झालेल्या सुनावणीत पीटर मुखर्जीला सायलंट किलर म्हणत त्याला कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळू नये असं सीबीआयकडून कोर्टाला सांगण्यात आलं होतं. त्यावेळीही त्याचा जामीन कोर्टानं फेटाळला होता. शीना बोराची हत्या 2012 मध्ये करण्यात आली. तिची आई इंद्राणी मुखर्जीने, तिचा आधीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्या मदतीने शीनाची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाटही लावली.

शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीची बहीण नसून मुलगी आहे हे सत्य पीटरला ठाऊक होते. तसेच पीटरला पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा राहुल आणि शीनाचे प्रेमसंबंध जुळले आहेत ही बाबही त्याला ठाऊक होती. अशी माहिती विशेष सरकारी वकिलांनी कोर्टात मागील सुनावणीच्या वेळी दिली होती. शीना बोराचा शोध घेण्यासाठी पीटरने कोणतीही पावलं उचलली नाहीत. शीना कुठे आहे, हे माहित नसल्याचेच त्याने सातत्याने तपासयंत्रणेला सांगितले आहे.