मुंबई : बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणी उमेदवाराची थेट उमेदवारीच रद्द झाल्यास समाजात योग्य तो संदेश जाईल. जर एखाद्या राजकीय पक्षांनी तशी स्वत:हून तजवीज केल्यास आम्ही त्या निर्णयाचं मनापासून स्वागत करू, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत.
राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंगविरोधात सुस्वराज्य फाऊंडेशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.
सोमवारच्या सुनवणीत हायकोर्टानं भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांचा खरपूस समचार घेतला. बेकायदा बॅनरविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयानं धारेवर धरलं. घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी घेत माफी मागा आणि पालिका अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीबद्दल पालिकेकडे नुकसानभरपाई देऊन हे प्रकरण संपवा, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले.
आपल्या कार्यकर्त्यांसह न्यायालयात दाखल झालेल्या मुरजी पटेल यांनी नुकसानभरपाई देण्याचं मान्य केलं. मात्र बेकायदेशीर होर्डिंग लावल्याचं कबूल करण्याबाबत मौन बाळगलं. यावर हायकोर्टानं जाब विचारल्यानंतर हायकोर्टात जर ही बाब कबूल केली, तर उद्या आपलं राजकीय भविष्यच धोक्यात येईल. तसेच या संदर्भात पोलिसांत गुन्हा नोंदवला गेला असल्यानं अशाप्रकारे हायकोर्टात त्यावर थेट सुनावणी होऊ शकत नाही, असं याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं.
महापालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमानाची कारवाई का करु नये? अशी नोटीस उच्च न्यायालयाने नगरसेवकांसह कार्यकर्त्यांना बजावली आहे. एवढेच नव्हे तर याप्रकरणी आपली भूमिका 12 मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल व केसरबेन मुरजी पटेल यांच्या जीवनज्योती फाऊंडेशनतर्फे अंधेरीतील पालिका मैदानाबाहेर व फुटपाथवर बेकायदा होर्डिंग व बॅनर लावल्याची तक्रार पालिकेच्या वेबसाईटमार्फत मिळाली होती. त्यानुसार, खातरजमा केल्यानंतर के वॉर्डातील लायसन्स इन्स्पेक्टर उत्तम सरवदे हे आपल्या सहकाऱ्यांसह कारवाईस गेले होते.
महापालिका अधिकारी हे होर्डिंग्स काढत असताना पटेल यांचे समर्थक व भाजपचे कार्यकर्ते राजू सरोज, सुनील चिले, रोशन शेख, नरेश शेलार, महेश शिंदे, प्रकाश मुसळे, विशाल निचिते यांनी त्यांना प्रचंड शिवीगाळ करत पालिका कर्मचाऱ्यांना मारहाणही केली’, असे महापालिकेने अवमान याचिकेद्वारे हायकोर्टाच्या निदर्शनास आणले. तसेच यासंदर्भातील फोटोही पुरावा म्हणून दाखल केले आहेत.