मुंबई: मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि तिचा मालक मनसुख हिरेनचा गूढ मृत्यू प्रकरणातील आरोपी आणि माजी पोलीस अधिकारी सुनील मानेनं माफीचा साक्षीदार होण्यासाठी कोर्टात दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. या अर्जाला राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) जोरदार विरोध केला होता.


बराच काळ कारागृहात राहिल्यावर आपण केलेल्या चुकांचा आपल्याला पश्चाताप झाला आहे. म्हणूनच आपण यात माफीचा साक्षीदार होण्याचा निर्णय घेतल्याचं माजी पोलीस अधिकारी सुनील मानेनं फेब्रुवारी महिन्यात कोर्टात केलेल्या अर्जात नमूद केलं होतं. आपल्या 26 वर्षांच्या कारकिर्दीतील कामगिरीचं चांगल्या पद्धतीने मूल्यांकन केले गेलं आहे. केंद्र तसेच राज्य सरकारचे अनेक पुरस्कारही आपल्याला मिळालेत. पण दुर्दैवानं आणि नकळत आपल्याकडून काही चुका झाल्या. त्या चुकांचा पश्चात्ताप करण्यासाठी बळी पडलेल्यांना न्याय देण्यासाठी या प्रकरणातील घटनाक्रम आणि तथ्यं उलगडून सांगण्याचा निर्णय घेतल्याचं सुनील मानेनं या पत्रात म्हटलं होतं. तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 307 अंतर्गत न्यायालयाकडे माफीचा साक्षीदार होण्याची मागणीही केली होती. 


मात्र मानेच्या या अर्जाला केंद्रीय तपासयंत्रणा (एनआयए)नं जोरदार विरोध केला होता. या प्रकरणात सुनील माने हा इतर आरोपींप्रमाणेच सहभागी असल्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी भूमिका एनआयएनं कोर्टात घेतली होती. या अर्जावरील सुनावणी प्रलंबित असतानाच मानेकडून अचानक हा अर्ज मागे घेण्यात आला आहे. तसेच या खटल्यात आपली बाजू आपण स्वतःच माडणार असल्याचं सांगून त्याबाबतची रितसर परवानगीही कोर्टाकडे मागितली आहे.


सचिन वाझेविरोधात कारगृह अधिक्षकांची तक्रार


या खटल्यातील मुख्य आरोपी आणि बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेविरोधात तळोजा कारागृहाकडून मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात तक्रार करण्यात आली. या तक्रारीनुसार, 23 एप्रिल रोजी वाझेला चक्कर आणि उलट्या होत होत्या. त्यामुळे वाझेला कारागृहाच्या रुग्णालयात दाखल करण्यास येत होतं. परंतु, वाझेनं त्यास हट्टानं नकार देत पोलिसांशी हुज्जत घातली असं या तक्रारीत म्हटलं आहे.


यापूर्वी वाझेकडून आपल्याला कारागृहात योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. वाझे भविष्यातही जाणूनबूजून अशीच तक्रार करण्याची शक्यता असल्यानं कारागृह अधिकाऱ्यांनी त्याची वागणूक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच याप्रकरणी न्यायालयानं सचिन वाझेला समज द्यावी, अशी मागणीही तक्रारीतून केली गेली. मात्र, वाझेला कोणतीही वैद्यकीय नोंद न दाखवताच तिथं दाखल होण्यास सांगितलं जात होतं. तसेच वाझेला कारागृहातील रूग्णालयातील स्वच्छतेचीही चिंता होती. कारण, कारागृहामधील रुग्णालयात फारच गर्दी असते आणि आपली नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झाल्यामुळे विशेष सावधगिरी बाळगणँ आवश्यक असल्यानं आपण तशी भूमिका घेतल्याचं वाझेच्यावतीनं न्यायालयाला सांगण्यात आलं. कोर्टानं तूर्तास या संपूर्ण प्रकरणाची नोंद घेतली आहे.


ही बातमी वाचा: