मुंबई : मुंबई लोकलमध्ये आता केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना देखील प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकत्रितपणे यासंदर्भातली माहिती दिली आहे. यासोबत दोन्ही मार्गांवर आता एकूण 700 लोकल गाड्यांच्या सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 1 जुलैपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देखील ट्रॅफिकमधून वाट काढत प्रवास न करता लोकलने प्रवास करता येणार आहे.


भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी रविवारी (28 जून) ट्वीट करुन केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र रेल्वे अधिकार्‍यांकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नव्हती. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने एका पत्राद्वारे राज्य सरकारला हे आदेश दिले होते. मात्र या कर्मचाऱ्यांना परवानगी देण्याच्या आधी रेल्वे प्रशासनाला पूर्वतयारी करणे देखील आवश्यक होते. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार अशा दोन्ही दिवशी राज्य सरकार आणि रेल्वे अधिकारी यांच्यात बैठका झाल्या. नक्की किती वाढीव प्रवासी प्रवास करणार आहेत याची माहिती रेल्वेने राज्य सरकारकडे मागितली होती. राज्य सरकारने ही माहिती गोळा करुन रेल्वेला दिल्यानंतर केंद्र सरकारच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.





केंद्र सरकारच्या कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना परवानगी


केंद्र सरकारच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी, इन्कम टॅक्स विभाग, जीएसटी विभाग, कस्टम विभाग, भारतीय पोस्ट, राष्ट्रीयीकृत बँका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्याय विभाग आणि राजभवनातील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच संरक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा देखील यात समावेश आहे. त्यामुळे नक्कीच लोकलने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड वाढणार आहे. या सर्व प्रवाशांना आपले ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश दिला जाईल.


दुसरीकडे प्रवाशांची संख्या वाढल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेला देखील आपल्या लोकल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी लागत आहे. याआधी मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वेवर मिळून 200 लोकलच्या फेऱ्या चालवल्या जायच्या. मात्र आता त्या वाढवून थेट 350 लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येतील. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर 202 लोकलच्या फेऱ्या चालवल्या जायच्या, त्यात देखील वाढ करुन आता 350 लोकलच्या फेऱ्या एका दिवसात चालवल्या जातील. या सर्व लोकल केवळ जलद लोकलच्या स्थानकांवर थांबतील. स्थानकात येणाऱ्या प्रत्येकाला एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे लागेल. तिकीट काऊंटरवर देखील सुरक्षित अंतर ठेवून तिकीट किंवा पास काढावे लागतील. सामान्य नागरिकांना अजूनही लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी स्थानकात जाऊ नये आणि गर्दी करु नये, असं आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे.