मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत मुंबईकरांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवासादरम्यान मुंबईकरांना होणारा त्रास काहीसा कमी होणार आहे. मेट्रो सेवा सुरु करण्याबाबतची SOP लवकरच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रोसह सरकारी आणि खासगी लायब्ररी देखील सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. शाळा आणि कॉलेज मात्र 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच असणार आहेत. लायब्ररी सुरु करताना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहेत. उच्च तंत्र आणि शिक्षण विभागाकडून याबाबतचे SOP जारी करण्यात येणार आहेत. याशिवाय कन्टेनमेंट झोनबाहेरील दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा मिळाली आहे.
शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान शाळांना 50 टक्के शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.