मुंबई : स्वतःच्या वडिलांची जबाबदारी न घेणाऱ्या मुलाला चांगलीच अद्दल घडवण्यात आली. मुंबईतील 72 वर्षीय शंकर वाघमारे यांना त्यांच्या मुलाने घराबाहेर काढलं. त्याला त्याची चूक समजावी म्हणून भाजप आमदार भारती लव्हेकर यांनी होर्डिंग लावलं आणि अखेरीस मुलाने वडिलांना घरी घेऊन जायची तयारी दर्शवली.

शंकर वाघमारे, वय वर्ष 72.. मुंबईतील वर्सोवा मंदिरात एकटेच बसलेले.. स्वतःशीच बोलत असतात.. व्यवसायाने ते चित्रकार आहेत. आठ वर्षांपूर्वी शंकर यांना विकास या त्यांच्याच पोटच्या पोराने घराबाहेर काढलं. घरातून बाहेर काढल्यानंतर बेघर झालेले शंकर वाघमारे राहण्यासाठी मंदिरात गेले. या काळात ते नातेवाईकांसह विविध ठिकाणी राहिले.

शंकर वाघमारे काही दिवसांपूर्वी भाजप आमदार भारती लव्हेकर यांच्या संपर्कात आले. भारती लव्हेकर यांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन एक वेगळीच शक्कल लढवली. शंकर वाघमारे यांच्या मुलाला पश्चात्ताप व्हावा म्हणून त्यांनी होर्डिंग लावलं.

या संपूर्ण प्रकरणाबाबत शंकर वाघमारे यांच्या मुलाशी एबीपी माझाने संपर्क साधला. वडिलांशी बोलणं झालं असून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणार आहे. मात्र हे होर्डिंग लावायला नको होतं, अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली.

समाजात बोभाटा झाला म्हणून शंकर वाघमारे यांच्या मुलाने बापाची जबाबदारी स्वीकारली. देशात आणि राज्यात असे कित्येक शंकर वाघमारे आहेत, ज्यांना पोटच्या लेकराने घराबाहेर काढलं आहे. मात्र जन्मदात्यांना घराबाहेर काढणाऱ्यांना समाजानेच अद्दल शिकवणं गरजेचं आहे, हे या प्रकरणातून सिद्ध झालं आहे.