कल्याणः मध्य रेल्वेवर प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकावर आज सकाळी सहा वाजता कुर्ला ते बदलापूर ट्रेनमधून गोणीतून मृतदेह फेकल्याचा प्रकार घडला आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.
रेल्वे पोलिसांनी पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे.
तोंड दाबून केली हत्या
अंबरनाथ स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर सकाळी सहा वाजता आलेल्या ट्रेनमध्ये एक गोणी ठेवण्यात आली होती. ही माहीती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाअंती गोणीत तरुणाचा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तरुणाची तोंड दाबून हत्या केली असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती रेल्वेचे पोलिस निरीक्षक अनंत राणे यांनी दिली.
दरम्यान, मृताची ओळख अजून पटलेली नाही. त्यामुळे पोलिस सध्या कुर्ला, ठाणे, अंबरनाथ, मुंब्रा या स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत आहेत, असं राणे यांनी सांगितलं.