मुंबई : मराठा आरक्षणाच्या बैठकीला केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पाठ फिरवली. राज्य सरकारने आज दुपारी चार वाजता बैठक आयोजित केली होती. याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने मंत्री रविशंकर प्रसाद सहभागी होणार होते. मात्र, ऐनवेळी ते सहभागी झाले नाहीत. मराठा आरक्षण प्रकरणी होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने ही बैठक महत्वाची मानली जात होती.
मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या सोयीसाठी बैठकीची वेळही बदलण्यात आली होती. रविशंकर प्रसाद यांच्यासाठी साडे बारा वाजताची बैठक संध्याकाळी चार वाजता करण्यात आली. मराठा आरक्षण प्रकरणी होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने बैठक होणार होती. 18 मार्चला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीसाठी केंद्र सरकार न्यायालयात बाजू मांडण्यासंदर्भातील आजची बैठक महत्वाची होती. तरीही केंद्रीय मंत्र्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला सहकार्य करण्यासाठी आधी पत्रव्यवहार केला होता. आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेबाबत केंद्राची भूमिका महत्त्वाची आहे, त्यासाठी आजची बैठक महत्वाची असताना केंद्रीय मंत्री बैठकीला गैरहजर राहिले आहे. आता यावर राज्यातील भाजप नेते काय भूमिका मांडतात हे महत्वाचे आहे.
केंद्राचा निषेध : राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील
मराठा आरक्षणासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्वनिश्चिती घेतलेल्या आजच्या उच्चस्तरीय बैठकीतून केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्राचे ॲटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी दांडी मारून सपशेल पळ काढला आहे. केंद्र सरकारचे अघोषित प्रवक्ते देवेंद्र फडणवीस म्हणाले की "एका बाजूच्या (मराठा आरक्षणाच्या) बैठकीस उपस्थित राहणे योग्य नव्हते." म्हणजेच केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्या बाजुने (आरक्षणाच्या विरोधात) आहेत हे सुस्पष्ट झाले, असाल्याचा आरोप मराठा समाज राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी केला आहे.