मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाने घाणेरडं राजकारण करुन माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि या प्रकरणातून सत्य बाहेर यावे, यासाठी मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे राठोड म्हणाले.


मी ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतो त्यातील बंजारा समाजाच्या एका मुलीने आत्महत्या केली. त्याचा संबंध माझ्याशी जोडून मला गुन्हेगार ठरवले. विरोधी पक्ष, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून माझी बदमानी करून मला राजकीय जीवनातून उठविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अनेकांना उसंत नव्हती, त्यामुळे मी बाजुला होऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी राजीनामा दिला आहे, असे स्पष्टीकरण वनमंत्री संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांपुढे दिले.यावेळी राठोड यांच्यासोबत संसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेनेचे नेते अनिल देसाई उपस्थित होते.


राठोड म्हणाले, ‘गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून मला राजकीय जीवनातून उठविण्याचा घाणेरडा प्रयत्न केला. गेल्या 30 वर्षांपासून मी राजकीय जीवनात आहे. आज मला उद्ध्वस्थ केलं आहे. या प्रकरणाचा तपास होऊन जर मी दोषी निघालो असतो तर मी राजीनामा दिला असता. पण मला वेळ दिला नाही. त्यामुळे मी बाजुला होऊन या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. या प्रकरणाचा माझ्या व्यक्तिगत आणि राजकीय जीवनावर परिणाम झाला आहे. माझ्या समाजावरही परिणाम झाला आहे. आम्ही अधिवेशनच चालू देणार नाही, ही विरोधी पक्षाची भूमिका लोकशाहीविरोधी आहे. त्यामुळे सत्य बाहेर यायचे असेल तर चौकशी होऊ द्यावी लागेल.’


राजीनामा देताना राठोड यांनी विनंती


राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.


Sanjay Rathod Resign | राजीनाम्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...