मुंबईः भारताबाहेर राहून मुंबईत तब्बल दोन दशकं आपली गँग चालवणारा अंडरवर्ल्ड डॉन कुमार पिल्लई याला भारतात आणण्यात येत आहे. सिंगापूर एअरपोर्टवर 6 महिन्यांपूर्वी पिल्लईला अटक करण्यात आली होती.


 

मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस पिल्लईला आज रात्री भारतात आणत आहेत. पिल्लईला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. पिल्लईचे एलटीटीई प्रमुख प्रभाकरणशी खास संबंध होते, ज्यामुळे त्याने एवढे दिवस अंडरवर्ल्डमध्ये आपला दबदबा कायम ठेवला.

 

अशी झाली अटक

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पिल्लईने अंडरवर्ल्डमध्ये पाऊल ठेवलं. उच्चशिक्षित असलेल्या पिल्लईने 1980 च्या दशकात हत्या, हेराफेरी, खंडणी वसूली अशा गुन्ह्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला.

 

पिल्लई अनेक वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता मात्र, मागील वर्षी हाँगकाँग येथून सिंगापूरला जाताना त्याला सिंगापूर पोलिसांनी अटक केली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

 

पिल्लईवर असलेले गुन्हे

पिल्लईवर 2013 साली विक्रोळीतील मनसेच्या एका नेत्याकडून 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. कांजुर मार्ग आणि विक्रोळी या भागात पिल्लईने 2008-09 साली दोन बिल्डरांवर गोळ्या घातल्याचा आरोप आहे. या तीन गुन्ह्यांखाली मुंबई पोलिस पिल्लईवर खटला चालवण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त पिल्लईवर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र कांजुर मार्ग आणि विक्रोळी येथील प्रकरणाचा खटला दाखल होण्याची शक्यता आहे.

पिल्लई विक्रोळीतील शाळेचा मालक

सिंगापूरमध्ये अटक करण्यात आलेला पिल्लई भारताबाहेरुन आपली मुंबईतील शाळा चालवत होता. विक्रोळी येथे पिल्लईच्या मालकीची शाळा आहे. या शाळेत जवळपास 2 हजार विद्यार्थी शिकतात. पिल्लईच्या वडलांनी हि शाळा सुरु केली होती. ज्यांची दाऊदने त्यांची हत्या केली.

 

दरम्यान पिल्लईवर सध्या तीन गुन्ह्याअंतर्गत खटला चालवला जाणार आहे. पिल्लईवर अनेक महत्वाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र गुन्हे शाखा महत्वाच्या गुन्ह्यांखाली खटला चालवण्याची शक्यता आहे.