मुंबई : भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि मुंबईचा सर्वात मोठा गुन्हेगार अर्थात दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा आज लिलाव होणार आहे. दाऊदचं मुंबईतलं घर, हॉटेल आणि गेस्ट हाऊससाठी चर्चगेटमधल्या इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यालयात बोली लावली जाईल.


सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा लिलाव सुरु असेल. दाऊदची संपत्ती विकत घेण्यासाठी आतापर्यंत 12 जणांनी महसूल विभागाकडे माहिती मागवली आहे. इच्छुक बंद लिफाफा, स्वत: उपस्थित राहून आणि ई-ऑक्शनमध्ये सहभागी होऊन बोली लावणार आहेत.

दाऊदच्या संपत्तीचा लिलाव होणारच
सरकारने आतापर्यंत अनेकवेळा दाऊदची संपत्ती विकण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी लिलावाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. मात्र यावेळी दाऊदच्या मुसक्या आवळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत त्याच्या प्रत्येक संपत्तीचा लिलाव केला जाईल, असं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.

दाऊदचं हॉटेल तोडून शौचालय बनवणार
दरम्यान दाऊदच्या मालकीचं अफरोज हॉटेल विकत घेऊन त्या ठिकाणी निशुल्क शौचालय बांधण्याचा निर्धार हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केला आहे.

दाऊदच्या कोणत्या संपत्तीचा लिलाव?
डांबरवाला बिल्डिंग, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
लिलावाची सुरुवातीची किंमत - 1 कोटी 55 लाख 76 हजार

होटल रौनक अफरोज, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
लिलावाची सुरुवातीची किंमत - 1 कोटी 18 लाख 63 हजार

शबनम गेस्ट हाऊस, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
लिलावाची सुरुवातीची किंमत - 1 कोटी 21 लाख 43 हजार

याआधीही दाऊदच्या संपत्तीचा लिलाव
लिलावासाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाने वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. 2015 मध्येही दाऊदच्या संपत्तीचा लिलाव झाला होता. पत्रकार बालाकृष्ण यांनी दाऊदच्या रौनक अफरोज हॉटेल लिलावात खरेदी केलं होतं. पण 30 लाख रुपये जमा केल्यानंतर उर्वरित 4 कोटी रुपये त्यांना देता आले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा हॉटेलचा लिलाव होणार आहे.

मागील लिलावात दाऊदची हिरव्या रंगाची कार स्वामी चक्रपाणी यांनी  32,000 रुपयांत खरेदी केली होती. यानंतर ही कार दहशतवादाचं प्रतीक असल्याचं सांगत गाझियाबादमध्ये ती पेटवून दिली होती.

इतकंच नाही बोली लावणाऱ्यांना अंडरवर्ल्डकडून धमकीही देण्यात आली होती. त्यामुळे अशा परिस्थितीत किती इच्छुक समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.