मुंबई : कंगना रणौतला अंधेरी दंडाधिकारी कोर्टात 1 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यासाठी हे समन्स जारी करण्यात आलं आहे. कंगना जर या सुनावणीसाठी गैरहजर राहीली तर तिच्याविरोधात अटक वॉरंटही जारी होऊ शकतं. या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी कंगनानं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र यावर सुनावणी घेण्यास नकार देत सोमवारी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या खंडपीठानं कंगनाला योग्य कोर्टापुढे दाद मागण्याचे निर्देश दिलेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार या याचिकेवर एकलपीठासमोर (सिंगल बेंच) सुनावणी होणे अपेक्षित असल्याचं जावेद अख्तर यांच्यावतीनं बाजू मांडणाऱ्या अँड. वृंदा ग्रोव्हर यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्याची दखल घेत हायकोर्टानं कंगनाला योग्य न्यायालयाकडे दाद मागण्याचे निर्देश दिलेत.
गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं कंगान रणौतला यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. कंगानं काही दिवसांपूर्वी कोर्टापुढे प्रत्यक्ष हजर राहात या प्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला होता. मात्र या खटल्याच्या वैधतेला आव्हान देत कंगनानं दाखल केलेली याचिका फेटाळत दिंडोशी सत्र न्यायालयानं दिलासा नाकरल्यानं आता कंगनापुढे हायकोर्टात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक आहे.
काय आहे प्रकरण?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कंगनानं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली. मात्र, या संवेदनशील प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसताना आपल्यावर खोटे आणि आधारहीन आरोप कंगनानं केले आहेत. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून प्रचंड मनस्ताप झाला आहे असा आरोप करत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली आहे.
याप्रकरणी कंगनावर आयपीसी कलम 499 आणि 500 नुसार अब्रुनुकसानी केल्याचा फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी अख्तर यांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यावर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात न्यायाधीश आर. आर. खन्हद यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई पोलिसांनी आपला चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर केला. मात्र, कंगनाचा यासंदर्भात जबाब नोंदवणं अद्याप बाकी असल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितले होतं. त्याची दखल घेत न्यायालयाने कंगनाला वॉरंट जारी केला आहे.