मुंबई : अंडर-19 विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने याने आज (बुधवार) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पृथ्वी शॉचं तोंडभरून कौतुकही केलं.


‘पृथ्वीनं फक्त खेळण्यावर लक्ष द्यावं, घराच्या चिंतेने त्याला त्रस्त होऊ देणार नाही.’ असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं. ‘पृथ्वीनं केलेल्या पराक्रमाला तोंड नाही, त्याच्या विजयाचं कौतुक शब्दात करता येणार नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पृथ्वी शॉला शाबासकी दिली.

'पृथ्वी' आजही मुंबईत हक्काच्या घरात नसल्याचं वृत्त एबीपी माझाने कालच (मंगळवार) दाखवलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली.

‘पृथ्वी'ला हक्काचं घर द्या, शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अंडर-19 टीमचा कर्णधार पृथ्वी शॉनं विश्वचषक उंचावत जगाच्या नकाशावर भारताचा झेंडा अभिमानानं मिरवला. जगभरात त्याचं कौतुक झालं. पण आपल्या घरात तो हक्काच्या चार भिंती आणि एका छतापासून वंचित आहे. त्यामुळे मुंबईत पृथ्वी शॉला हक्काचं घर मिळावं, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

पृथ्वी शॉ आधी विरारला राहत होता. मात्र, त्यानं 2013 ला हॅरीस शिल्डमध्ये 500 धावा फटकावल्यानंतर आमदार पोतनीस यांनी त्याची व्यवस्था वाकोल्याच्या एसआरए कॉलनीत केली. मात्र, ही जागा अपुरी असून ती कायमस्वरुपी वास्तव्यासाठी नाही. त्यामुळे पृथ्वीला हक्काचं घर देऊन त्याला सन्मान द्यावा अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे.

संंबंधित बातम्या :

‘पृथ्वी'ला हक्काचं घर द्या, शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी