मुंबई : सर्व मुंबईकरांना कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जागतिक स्तरावर प्रसिद्ध केलेल्या लस पुरवठा ग्लोबल टेंडर प्रक्रियेचा काल  (दिनांक 1 जून 2021) शेवटचा दिवस होता. आतापर्यंतच्या ग्लोबर टेंडरच्या अंतिम मुदतीपर्यंत 10 संभाव्य पुरवठादारांचा प्रतिसाद लाभला आहे. त्यापैकी, एका पुरवठादाराने यापूर्वीच माघार घेतल्याने शिल्लक एकूण 9 संभाव्य पुरवठादारांच्या कागदपत्रांची छाननी येत्या 2 ते 3 दिवसांत केली जाणार आहे. 


या 9 संभाव्य पुरवठादारांपैकी 7 पुरवठादारांनी स्पुटनिक फाईव्ह या कोविड लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे. तर त्यातीलच एका पुरवठादाराने स्पुटनिक लाईट या कोविड लसीचा पुरवठा करण्यात स्वारस्य दाखविले आहे. तर अन्य एका पुरवठादाराने मान्यता प्राप्त लसींपैकी जी प्राप्त होईल त्या लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे.


महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिलेल्या निर्देशानुसार, उपआयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार तसेच उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे आणि सहकारी अधिकारी कोविड लस पुरवठा उपलब्ध करुन घेण्याबाबतची ही कार्यवाही पार पाडत आहेत.   
   
कोविड-19 प्रतिबंधक लस पुरवठ्याबाबतच्या या जागतिक स्वारस्य अभिव्यक्तीस यापूवी दिनांक 18 मे 2021 आणि दिनांक 25 मे 2021 रोजी मुदतवाढ देण्यात आली होती. आता अंतिम मुदतीत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची पडताळणी करण्यात येत आहे. म्हणजेच सदर स्वारस्य अभिव्यक्तीस यापुढे मुदतवाढ देण्यात आलेली नाही. 


लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादीत करीत असलेल्या कंपन्या या दोघांदरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अवश्यक आहे. जेणेकरुन लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीतपणे होईल, याची खात्री पटेल आणि किती दिवसांत लस साठा पुरवला केला जाईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर आणि रक्कम अधिदान करण्याच्या अटी आणि शर्ती या 4 मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन महानगरपालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सतत पाठपुरावा करीत आहे. सर्व कागदपत्रांची छाननी करुन याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Corona Vaccination : मुंबई महापालिकेच्या लसींच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून एका पुरवठादाराची माघार; पालिकेच्या अडचणीत भर