उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये दुचाकी टो करण्यावरुन वाहतूक पोलिस आणि दुचाकी चालकामध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 50 वर्षीय जवाहर वसुमल लुल्ला यांना मारहाण झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


लुल्ला यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. त्यावेळी पाटील नावाच्या वाहतूक पोलिसाने दुचाकी टोईंग गाडीत टाकण्यास टो कर्मचाऱ्याला सांगितलं.

आपण समोर असतानाही दुचाकी टो केल्याचा दावा करत जवाहर जाब विचारण्यासाठी पोलिसांच्या टोईंग गाडीमागे धावले. त्यांनी आपली दुचाकी टोईंग कारमधून खाली खेचण्याचाही प्रयत्न केला. मात्र टो कारचालकाने गाडी सुरु केली.

गाडी सुरु झाली आणि वाहतूक पोलिस दार लावत असतानाच जवाहर मध्ये पडले. गाडी सुरुच राहिली, दोघांमध्ये बाचाबाची झाली. अखेर गाडी थांबली आणि वाहतूक पोलिसाने खाली उतरुन जवाहर यांच्या कानशिलात लगावली. प्रत्युत्तरादाखल लुल्ला यांनीही पोलिसाच्या श्रीमुखात भडकवल्याचं दिसत आहे.

आपण समोर असतानाही दुचाकी टो केल्यामुळे जाब विचारल्याचा दावा जवाहर यांनी केला आहे. उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेक्शन 17 मध्ये हा प्रकार घडला.

मारहाणीचा प्रकार कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ :