उल्हासनगरमध्ये रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 11 Sep 2018 10:08 AM (IST)
संतोषची हत्या ही पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
उल्हासनगर : रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या झाल्याचा प्रकार उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. संतोष जुबले असं हत्या झालेल्या 20 वर्षीय रिक्षाचालकाचं नाव असून तो उल्हासनगरच्या कॅम्प 4 भागात राहणारा होता. संतोषची काल दुपारच्या सुमारास काही अज्ञातांनी डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील अश्विनी हॉटेलजवळ दगडाने ठेचून हत्या केली आणि मृतदेह तिथेच टाकून दिला. रात्री पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. संतोषची हत्या ही पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी चार संशयितांवर हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.