उल्हासनगर :  उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आपण केलेलं 'ते' वक्तव्य मस्करीत केलं होतं, असे महापौर कलानी यांनी म्हटले आहे.


उल्हासनगर महापालिकेची महासभा सुरू असताना 'मला मराठी येत नाही, सिंधीत बोला' असं वक्तव्य महापौर पंचम कलानी यांनी केलं होतं. या प्रकारानंतर शहरात मोठी नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे आता कलानी यांनी सारवासारव करत आपण जे काही बोललो ते मस्करीत बोललो असल्याचा दावा केला आहे. मात्र राज्यभरातून टीकेची झोड उठल्यावर कलानी यांनी केलेला हा दावा कितपत खरा मानायचा असा सवाल नागरिक करत आहेत.

'मला मराठी येत नाही, सिंधीत बोला!' महापौरांचा महासभेत मराठीद्वेष

उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी  त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. भर महापालिकेच्या महासभेत त्यांनी दाखवलेल्या मराठीद्वेष्टेपणामुळे शहरासह राज्यात नाराजी पसरली आहे. उल्हासनगर महापालिकेची महासभा मागील आठवड्यात पार पडली. या महासभेत शहरातल्या पाणीप्रश्नावरून रणकंदन सुरू होतं. त्यातच शिवसेनेचे नगरसेवक विजय पाटील यांनी मराठीत प्रश्न मांडायला सुरुवात केली. त्यावर महापौर पंचम कलानी यांनी त्यांना थांबवत आपल्याला मराठी येत नसून सिंधीत बोला, असं वक्तव्य केलं.

त्यावर पाटील यांनी तुम्हाला आम्ही सिंधीतही सांगितलं तरी कळत नाही असं प्रत्युत्तर दिलं. मात्र महापौरांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ शहरात व्हायरल झाल्यानंतर शहरात चांगलीच नाराजी पसरली. याबाबत मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला असून मराठी येत नसेल, तर महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका घेतली.

महापौरांना मराठी शिकण्यासाठी बाराखडीचं पुस्तक आणि पाटी पेन्सिल भेट देणार असल्याचं मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, पंचम कलानी या माजी आमदार पप्पू कलानी आणि विद्यमान आमदार ज्योती कलानी यांच्या सूनबाई आहेत. शहरात इतकी वर्ष वास्तव्य करून आणि शहरावर इतकी वर्ष सत्ता गाजवूनही त्यांना साधं मराठी येत नसल्याबाबत सध्या नाराजी व्यक्त होत आहे.