कल्याण : उल्हासनगरमध्ये बारबालेची हत्या करणाऱ्या प्रियकराला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे. महिलेचा मृतदेह रेक्झीनच्या बॅगेत भरुन आरोपी राजेश खान पसार झाला होता. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आशेळे गावात राहणाऱ्या जमिला खातून या महिलेशी विवाहित राजेश खानचे प्रेमसंबंध होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणातून त्याने गळा चिरुन तिची हत्या केली आणि कोलकात्याला पळ काढला.
राजेशची पत्नी आणि मुलं मूळगावी राहतात. तो अधूनमधून उल्हासनगरात येत होता. प्रेयसी जमिला हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याने तो तिच्यासोबत राहत होता. पण जमिला बारमध्ये काम करत असल्याचं त्याला आवडत नव्हतं. त्यातून दोघांचे नेहमी खटके उडत होते.
त्यातूनच झालेल्या भांडणात राजेशने तिला ठोशा-बुक्क्याने मारहाण करुन तिचा गळा आवळून ठार मारलं. त्यानंतर तिचा मृतदेह एका रेक्झीनच्या बॅगेत भरुन पळ काढल्याची कबुली राजेशने दिली आहे.
राजेशच्या मोबाईल टॉवरच्या माहितीमुळे तो कोलकात्यातील घरी जात असल्याचं दिसून आलं. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील पथक विमानाने कोलकात्याला रवाना झालं. राजेश खान पहाटे चारच्या सुमारास हावडा प्लॅटफॉर्मवर उतरताच या पथकाने त्याला ताब्यात घेतलं.