उल्हासनगर : डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ उल्हासनगरमध्ये सेंट्रल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अनोखं आंदोलन केलं आहे. डॉक्टरांनी रुग्णांना तपासताना हेल्मेट घालून काम करत निषेध व्यक्त केला.
बुधवारी ठाणे सिव्हील रुग्णालयात रुग्णासोबत असलेल्या तरुणाच्या टोळक्याकडून डॉक्टरांना मारहाण झाली होती. या घटनेसोबतच राज्यभरात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी व्यक्त केला. डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी उपयोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, ठाणे सिव्हील हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. बुधवारी सिव्हील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण झाली होती. तसंच हॉस्पिटलची तोडफोडही करण्यात आली होती. या प्रकरणी 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. रुग्णालय प्रशासनानं त्यांना सुरक्षा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला.
काय आहे प्रकरण?
ठाण्यातील महागिरी येथे मारहाणीत एका तरुणावर चॉपरने हल्ला झाल्याने त्याला उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेथे कोणीही वरिष्ठ डॉक्टर नसल्याने शिकाऊ डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते.
शिकाऊ डॉक्टरही उपचारात दिरंगाई करत असल्याचं सांगत रुग्णासोबत आलेल्या तरुणांच्या टोळक्यांनी तेथील डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. त्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता.