उल्हासनगर : उल्हासनगरात (Ulhasnagar) डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरचं डांबर चोरीला गेल्याचा उपहासात्मक आरोप मनसेने (MNS) केलाय. तसंच या डांबरचोराला शोधून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे केली आहे.


 उल्हासनगर शहरात पावसाळा झाल्यानंतर महापालिकेकडून आठ कोटी रुपये खर्चून विविध रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आलं होतं. मात्र डांबरीकरणानंतर अवघ्या काही तासातच हे रस्ते सुद्धा उकरले जाऊ लागले. त्यामुळे पालिकेने केलेल्या डांबरीकरणातलं डांबर चोरीला गेल्याचा उपहासात्मक आरोप मनसेने केला आहे. इतक्यावरच न थांबता हे डांबर चोरणाऱ्यांना शोधून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्याकडे केली आहे. 


उल्हासनगर महानगरपालिकेने केलेल्या डांबरीकरणात डांबरच नसल्याचा आरोप मनसेने यापूर्वी केला होता फक्त खडी आणि ऑईल टाकून रस्त्यावर त्याचा थर मारण्यात आल्याचं मनसेचं म्हणणं होतं. यानंतर आता मनसेने थेट सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे उपहासात्मक पद्धतीने याबाबत तक्रार केली असून डांबरचोरांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित विभागाला कळवण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एसीपी मोतीचंद राठोड यांनी दिली आहे.


रस्त्यावर करण्यात आलेल्या या निकृष्ट डांबरीकरणामुळे संपूर्ण रस्ताभर खडी पसरली असून त्यामुळे दुचाकी चालकांचे अपघात होऊ लागले आहेत. आतापर्यंत खड्ड्यांमुळे उल्हासनगर शहरात अनेक अपघात झाले असून त्यात काही जण जखमी झाले आहेत. तर काही जणांचा जीव सुद्धा गेला आहे. त्यामुळे हे प्रकार थांबवण्यासाठी आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे. या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप असून याकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने लक्ष देते का? हे आता पाहावं लागणार आहे. 


उल्हासनगर शहरात पावसाळ्यात अनेक प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली होती. पाऊस संपल्यानंतर उल्हासनगर महापालिकेने या खड्डे भरणीसाठी 8 कोटी रुपये मंजूर केले.   उल्हासनगर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलासह अनेक प्रमुख रस्त्यांवर डांबराचा थर मारण्यात आला. मात्र हे डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. डांबरीकरण केल्यानंतर अवघ्या 24 तासात हातानेच हे डांबर उकरलं जात असल्याचा प्रकार मनसेने समोर आणला आहे.  या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप  मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे. सोबतच पालिकेने आठ कोटी रुपये खर्च करून पैशांची नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोपही मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे.