मुंबई : फक्त बसेसच्या माध्यमातून नुसती शिवशाही नको, तर शिवशाही ही कामातूनही दिसली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वपक्षीय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना उद्देशून कानपिचक्या दिल्या आहेत.

एसटी महामंडळातर्फे शनिवारी कर्मचाऱ्यांचा नवीन गणवेश वितरण सोहळा आणि योजनांचं सादरीकरण मुंबई सेन्ट्रल इथं झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ‘जे बोलतो ते करतो’ असा मंत्री हवा असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत.

गणवेश वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवशाही ही फक्त गाडीवर नको, तर प्रत्यक्ष कारभारात ही दिसली पाहिजे. एसटी बदलते आहे ही चांगली गोष्ट आहे. मात्र या कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा प्रश्नही लवकर सुटला पाहिजे, अशा कानपिचक्या उद्धव यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिल्या.

याशिवाय पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेवरुनही उद्धव ठाकरेंनी सरकारला टोला लगावला. “गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबवायचे. पण ते बॅनर लावत नव्हते. पण स्वच्छता म्हंटलं की, आजही गाडगे बाबा आठवतात. कारण गाडगे बाबांना ही पांढरी दाडी होती.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या वापरात असलेल्या 568 बस स्थानकांपैकी 80 बस स्थानकांचे  नुतनीकरण येत्या वर्ष भरात केले जाणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

तसेच नव्याने बांधण्यात येणाऱ्या काही बस स्थानकावर दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून 60 आसनांची छोटी चित्रपट गृहे बांधण्यात येणार आहेत. ही चित्रपटगृहे केवळ मराठी चित्रपटांसाठी राखीव असतील, असंही महामंडळाकडून सांगण्यात आलं.

संबंधित बातम्या

2200 कर्मचाऱ्यांसाठी केवळ 90 ड्रेस, मापं न जुळल्याने गणवेश 5 मिनिटात परत

70 वर्षांत पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार