मुंबई : सहज गमतीने केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी महाआघाडीत सामील होण्याचा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेची पक्षांतर्गत भेट आज रंगशारदा सभागृहात आयोजित कऱण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नंतर बघू नाही तर नंतर बोलू असं म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात शिवसेनेची पक्षांतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवारांच्या तिसऱ्या आघाडीबद्दलच्या वक्तव्य़ावर पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी शरद पवारांची ऑफर आल्यावर पाहू असं म्हणत गराड्यातून काढता पाय घेतला.

मात्र या वक्तव्य़ाचा विपर्यास करत आपण महाआघाडीत सामील होण्याचा विचार करु असा चुकीचा समज सर्वांनी करुन घेतल्याचं म्हणत तुर्तास तिसऱ्या आघाडीतील सहभागावर उद्धव ठाकरेंनी मौन बाळगलं आहे.

तिसऱ्या आघाडीबद्दल शरद पवारांचं विधान काय?

शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारचं विधान करुन त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होण्याचं आमंत्रणच दिलं आहे. आज रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या 19 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पालघरमध्ये विजय झाल्याचा भाजपचा दावा किती पोकळ आहे हे सांगताना पवारांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.  नोटाबंदी, सरकारची चार वर्षे, ईव्हीएम बिघाड, महाराष्ट्र सदन अशा अनेक मुद्द्यांवरून पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

पुण्यातल्या शिंदे विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून हजारो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.