मुंबई : महापालिका निवडणुकांमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेली धुसफूस पूर्णपणे निवळल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधत होते.
राज्यातल्या युती सरकारला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचं आश्वासन खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. इतकंच नाही, तर सध्या शिवसेना मंत्र्यांचे राजीनामे खिशातून बाहेर काढून बाजूला ठेवल्याची प्रतिक्रिया देऊन शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष शमल्याचं जाहीर केलं. असं असलं तरी शिवसेना पक्षप्रमुखांनी आदेश दिला, तर राजीनामे जिथे पाठवायचे तिथे पाठवू, असं सांगून सेनेची भूमिका स्पष्ट केली.
महापालिकेतल्या निवडणुकीतलं मतदान पाहता, आम्ही स्वतंत्र लढलो असलो, तरी जनतेनं विरोधकांच्या विरोधात मतदान करुन शिवसेना आणि भाजप युतीलाच कौल दिल्याचा तर्क मुख्यमंत्र्यांनी मांडला. त्यामुळे जनमत विरोधात गेलेले विरोधक नैराश्याच्या गर्तेत गेल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आराखड्याचं काम सुरु असल्याचं सांगून, तूर, कापूस या पिकांच्या खरेदीसाठी विशेष योजना राबवल्या जात असल्याचाही दावा केला.