मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून (5 मार्च) सुरुवात होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अविश्वास ठराव आणणार नसल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला.
मुंबई महापालिकेच्या शर्यतीतून माघार घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेची पारदर्शक फसवणूक केली असल्याची टीका विरोधकांनी केली.
भाजप आणि शिवसेना हे दुर्योधन आणि दुशासन असून, कौरवांप्रमाणे त्यांनी सत्तेसाठी अधर्माचा वापर केला, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी हल्ला चढवला. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या नावाखाली शिवसेना फक्त राजकारण करत असल्याचं विखे-पाटील म्हणाले.
निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेमध्ये रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरुन धनंजय मुंडेंनी भाजप आणि शिवसेनेला त्यांच्या खास शैलीत टोला हाणला. दरम्यान, अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.