मुंबई : गणपती उत्सवानिमित्त राजकीय भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. या भेटीगाठींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. सर्व मतभेद विसरुन नेतेमंडळी एकमेकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'लाव रे तो व्हिडीओ' वरुन राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार एकमेकांविरोधात राहिले होते. मात्र राजकीय मतभेद विसरुन राज ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेतलं. तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या कृपाशंकर सिंह यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.



लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे हे शरद पवार यांच्या जवळ होते. राज ठाकरे यांनी घेतलेल्या 'लाव रे तो व्हिडीओ'ला आशिष शेलार यांनी पत्रकर परिषद घेऊन उत्तर दिलं होतं. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. ईव्हीएम आणि मोदी सरकारवर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांची ईडीने चौकशी सुरु केली होती. त्यानंतर आशिष शेलारांच्या गणपतीला गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आशिष शेलार यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं.



दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत उत्तर भारतीयांचा मोठा पाठिंबा असलेले काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. काँग्रेसपासून दूर जात असलेले कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. काल मुख्यमंत्र्यांनीही कृपाशंकर सिंह यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं. गेली दोन वर्ष मुख्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या घरी गणपतीनिमित्त जात आहेत, मात्र उद्धव ठाकरेंनी यंदा पहिल्यांदा त्यांच्या घरी भेट दिली. त्यामुळे गणपती उत्सवानिमित्त राजकीय हालचालीही सुरु झाल्या आहेत.