कांदिवली पूर्व हा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जात असलेल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील एक विधानसभा मतदारसंघ. 2009 च्या मतदारसंघ फेररचनेत हा मतदारसंघ तयार झाला. 2009 पूर्वी कांदिवली पूर्वचा परिसर बोरिवली विधानसभा मतदारसंघाचाच एक भाग होता. कांदिवलीचे विद्यमान आमदार भाजपचे अतुल भातखळकर आहेत. मराठी, गुजराती आणि मारवाडी समाजाची लक्षणीय मतदार असलेला हा बहुभाषिक मतदारसंघ आहे.

मतदारसंघाचा इतिहास

2009 साली नवीन बनलेल्या या मतदारसंघात पहिल्या निवडणुकीत काँगेसचे रमेश सिंह ठाकूर निवडून आले. त्यांनी भाजपच्या जयप्रकाश ठाकूर यांचा 11694 मतांनी पराभव केला होता. रमेश सिंह ठाकूर यांना 50 हजार 138 तर जयप्रकाश ठाकूर यांना 38 हजार 832 मते मिळाली होती. मात्र या पराभवासाठी 2009 च्या मनसेच्या लाटेला जबाबदार धरलं गेलं. कारण 2009 च्या निवडणुकांमध्ये मनसेने सर्व जागांवर उमेदवार दिले होते. कांदिवलीमध्ये विनोद पवार यांना 24 हजार 91 मते मिळाली होती. त्यामुळे भाजपच्या या पराभवासाठी मनसे जबाबदार असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

मात्र 2014 सालच्या निवडणुकीत भाजपने अतुल भातखळकर यांना रमेश सिंह यांच्या विरोधात उमेदवारी दिली. तब्बल 41 हजार 188 मतांनी भातखळकरांनी रमेशसिंह ठाकूर यांचा पराभव केला. या निवडणुकीत शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांनीही निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांना 23 हजार 385 मते मिळाली होती. यावेळी ते गोरेगाव पूर्वमधून निवडणूक लढविण्याचा तयारीत असल्याची चर्चा आहे.

2019 साठीची तयारी

या मतदारसंघात भाजपकडून अतुल भातखळकरांचं पुन्हा एकदा चर्चिलं जात आहे. पण त्यासोबतच काँगेसमधून भाजप प्रवेश केलेले रमेश सिंह ठाकूर ही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता भाजप तिकीट कोणाला देणार हे पाहावं लागेल आणि शिवसेना भाजप युती झाली नाही तर शिवसेनेला ही इथे नवा चेहरा शोधावा लागेल. काँगेसचे 2014 चे उमेदवार, माजी आमदार रमेश सिंह ठाकूर यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी मुंबई काँग्रेस महिला अध्यक्ष अजंता यादव यांच्या नावाची चर्चा आहे. या विभागात राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नाही. तसंच मनसेकडून विभाग अध्यक्ष हेमंत कांबळे ही निवडणूक  लढविण्यास इच्छुक आहेत.

कांदिवलीमध्ये रोड, ट्राफिक, वीज, पाणी या समस्या आहेतच पण त्यावहबरोबर मुंबईत धारावीनंतर मोठी झोपडपट्टी असलेल्या हनुमान नगर झोपडपट्टीचा पुनर्विकास, पोयसर नदीवरील 1700-1800 घरांचे पुनर्वसन, लोखंडवाला ते महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतून जाणारा डीपी रोड त्यामुळे 350 कुटुंबे बेघर होऊ शकतात यासारख्या समस्यांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाऊ शकते.  दोन वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळे निकाल दिलेला हा मतदारसंघ यावेळी कोणाला राजा बनवणार येणारा काळच सांगेल