मुंबई : पदवीधर निवडणुकीत ज्याप्रकारे विजय मिळाला, याचं सर्व श्रेय शिवसैनिकांचं असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, असेच जर आपण लढत राहिलो, तर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आज मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या विजयानंतर शिवसेनेकडून आभार बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विजयी आमदार विलास पोतनीस, खासदार संजय राऊत यांसोबतच मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक, शाखाप्रमुख इत्यादींची उपस्थिती होती.

हा विजयाचा सत्कार माझा नाही किंवा विलास पोतनीसाचा नाही, तर तो तुमचा विजय आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुंबई पदवीधर मतदारसंघातील विजय शिवसैनिकांना अर्पण केला.

आता येथून पुढे फक्त लढायचंच. आपला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आहे. जर तुमच्यासारखे शिवसैनिक एकत्र येत असतील, तर तेही स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

विलास पोतनीसांना मी सांगितलं की, मुंबईतील पदवीधर मुला-मुलींच्या नोकरीचे अनेक विषय आहेत. त्यांच्याकडे तुम्ही आधी पाहा. कारण अनेकजण नोकरीच्या शोधात फिरतात, त्यांच्यासाठी मार्ग काढावा, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.