मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भुजबळांना पक्षात न घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. शनिवारी दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी आमदार, खासदार यांच्या सोबत बैठक पार पडली. भुजबळांना विरोध करण्यासाठी बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व नेते एकत्र जमले होते.



छगन भुजबळांना पक्षात घेतलं तर काय फायदे होतील आणि काय तोटे होतील, यावर बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी सर्व शिवसैनिकांनी एका सुरात भुजबळांना विरोध केला. छगन भुजबळांनी बाळासाहेबांना दिलेला त्रास आम्ही विसरलेलो नाही. त्यामुळे तो राग आमच्या मनात आहे, असं शिवसैनिकांनी सांगितल्याची माहिती समोर येत आहे.


बाळासाहेब माझे वडील होते, असं म्हणत मी देखील त्यांना झालेला त्रास विसरलेलो नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. त्यामुळे आपण छगन भुजबळांना पक्षात घेणार नाही, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या शिवसैनिकांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशारीतीने भुजबळांच्या शिवसेनाप्रवेशाला जवळपास पूर्णविराम मिळाला आहे.


संबंधित बातम्या