मुंबई : कोरोना काळात केलेली कामं आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यास कमी पडलो, दुसऱ्या बाजूला भाजपकडून अपप्रचार आणि अफवा पसरवण्याचं काम झालं. त्याचा फटका विधानसभेला बसला अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली. आता मुंबई महापालिका लढाई ही आपल्या आईच्या अस्तित्वाची आहे, तिच्याशी गद्दारी करू नका असं आवाहन त्यांनी केलं. गद्दारांनी 'शिवसेना अमित शाह' किंवा 'शिवसेना अदानी' असं पक्षाचं नाव लावावं असा टोला त्यांनी लगावला. ईशान्य मुंबईच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिबिरात ते बोलत होते. 


निवडणुकीत बंडखोरी करू नका


लोकसभेनंतर आम्ही गाफील राहिलो. आपण केलेले काम हे विधानसभा निवडणुकीमध्ये जागेच्या साठमारीमध्ये घालवलं, ते लोकांना सांगू शकलो नाही असा खेद मित्रपक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.


उद्धव ठाकरे म्हणाले की, "ही लढाई ही पक्षाची नाही, राजकीय नाही तर मातृभाषेची, महाराष्ट्र धर्माची आहे. सर्व भेद गाडून मराठी माणसांची एकजूट करा. मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही लागो, तुम्ही तयार राहा. निवडणुकीमध्ये बंडखोरी नको. ही लढाई आईच्या अस्तित्वाची आहे, तिच्याशी गद्दारी करू नका. आज जसा तुम्ही लढण्याचा निर्धार केला तसा निवडणुकीतही विजयाचा निर्धार करा."


देवेंद्र फडणवीस म्हणतात की ते उद्धव ठाकरे नाहीत, तसे ते होऊही शकणार नाहीत. तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्याच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करा. लाडक्या बहिणींना सांगितल्याप्रमाणे 2100 रुपये द्या असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. 


यांच्या मालकाची कधी हुजरेगिरी केली नाही


उद्धव ठाकरे म्हणाले की, फडणवीस आज जी कामं त्यांनी केली असल्याचं सांगत आहेत ती कामं आपल्या काळात सुरू झाली. 2017 साली कोस्टल रोडचे भूमीपूजन आम्ही केलं. कोरोना काळात मेट्रोची कामं कधीही बंद पडू दिली नव्हती. फक्त तुमच्या मालकाची आणि त्याच्या मित्राची हुजरेगिरी कधीही केली नाही. कांजूरची जमीन ही त्यांनी अदानीच्या घशात घातली. 


भाजप हिंदुत्ववादी हेच फेक नॅरेटिव्ह


उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजप हिंदुत्ववादी असल्याचं सांगत आहे. भाजप हिंदुत्ववादी आहे हेच फेक नॅरेटिव्ह आहे. एका बाजूला 56 इंचाची छाती असल्याचं म्हणायचं, तिकडे जाऊन पाकिस्तामध्ये नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खायचा हे यांचं हिदुत्व. हिटलरला सुद्धा 90 टक्के मतं मिळाली, पुतीनलासुद्धा बहुमत मिळालं होतं. तसंच यांना आता लबाडी करून बहुमत मिळालं आहे. हिटलरचे चार पातळीवर काय असायचं. त्यामध्ये एक काम होतं ते नुसता अफवा परसवणं. आता जे काय सुरू आहे त्यामध्ये साम्य दिसत आहे. केवळ भुलवण्यासाठी जय श्री राम म्हणायचे. पण काम काही करत नाहीत. आज मुंबईची अस्मिता बुडवायला निघाले आहेत."


कोरोना काळात केलेल्या कामामुळे मुस्लिम सोबत


मुस्लिम आमच्यासोबत आले तर यांच्या पोटात काय दुखतंय? लगेच ते व्होट जिहाद म्हणतात. कोरोना काळात केलेल्या कामामुळे मुस्लिम आमच्यासोबत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, इतकी वर्षे आपण यांना डोक्यावर घेऊन दिल्ली दाखवली, त्यांनी सत्ता मिळाल्यानंतर लगेच खरं रुप दाखवलं. 2014 साली सत्ता आल्यानंतर त्यांनी लगेच युती तोडली. त्यावेळी आम्ही हिंदू नव्हतो का? 


निवडणूक आयोगाने आपल्यावर अन्याय केलाय. सर्वोच्च न्यायालयात पक्षाचा निकाल लागत नाही. आता हातात काही नाही, मी काही देऊ शकत नाही. पण तरीही तुम्ही माझ्यासोबत आहात. त्यामुळेच अभिमानाने पुढे जाऊ शकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


ही बातमी वाचा: