मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक झाली. ग्रामीण भागात नव्याने पक्षबांधणी, केंद्रातली भूमिका, आमदारांच्या मतदारसंघातील कामं आणि पुढच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. भाजपच्या लोकप्रतींधींना शिवसेनेच्या तुलनेने जास्त निधी मिळतो याबाबत नाराजी होती. याबाबत उद्या (31 मार्च) सकाळी 10 वाजता शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेणार आहेत, असे विजय शिवतारे यांनी सांगितले. संघटनात्मक बाबी, शेतकरी कर्जमुक्ती आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या बैठकीला सेनेचे कोणते मंत्री हजर होते?
  • एकनाथ शिंदे
  • रामदास कदम
  • दिवाकर रावते
  • सुभाष देसाई
  • दिपक सावंत
  • दादा भुसे
  • संजय राठोड
  • विजय शिवतरे
  • अर्जुन खोतकर
  • दिपक केसरकर